Fri, May 29, 2020 00:50होमपेज › Pune › पिंपरी चिंचवडमध्ये यावर्षी धार्मिक देखाव्यांवर भर

पिंपरी चिंचवडमध्ये यावर्षी धार्मिक देखाव्यांवर भर

Published On: Sep 09 2018 6:29PM | Last Updated: Sep 09 2018 6:29PMपिंपरी : प्रतिनिधी

गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरातील गणेशोत्सव मंडळांचा यावर्षी धार्मिक देखाव्यांवर भर असल्याचे दिसत आहे. नृसिंह अवतार, संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठगमन, स्वामी समर्थ लीला, अशा विविध विषयांवर देखावे केले जाणार आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही वर्षांपासून पुण्याप्रमाणेच गणेश मंडळे आकर्षक सजावट करत आहेत.  शहरात पाचशेहून अधिक छोटी मोठी गणेशोत्सव मंडळे असून, यावर्षी धार्मिक देखावे करण्यावर मंडळांचा भर आहे.  

निगडीतील जय बजरंग तरुण मंडळ जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठगमन या विषयावर देखावा करणार आहे. माजी नगरसेवक दत्ता पवळे अध्यक्ष आहेत. मंडळाचे हे ६२ वे वर्ष आहे. 
 चिंचवड गावातील गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे हे ४० वे वर्ष आहे. मंडळाच्या वतीने नृसिंह अवतार या विषयावर देखावा साकारला जाणार असून, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे अध्यक्ष आहेत
 नव तरुण मंडळ गंगा वतरण हा देखावा करणार असून, मंडळाचे हे ६५ वे वर्ष आहे. अनुराग चिंचवडे अध्यक्ष आहेत.

चिंचवड गावातीलच उत्कृष्ट तरुण मित्रमंडळ स्वामी समर्थ लीला साकारणार असून, मंडळाचे हे ३८ वे वर्ष आहे. माजी नगरसेवक आप्पा आगज्ञान अध्यक्ष आहेत.  
भोसरीतील लांडगे लिंबाची तालीम मंडळाचे हे ७७ वे वर्ष असून, यावर्षी मंडळ शिवराज्याभिषेक हा देखावा करणार आहे 

भोसरीतील पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळ बाबा अमरनाथ या विषयावर देखावा करणार आहे. मंडळाचे हे ६१ वे वर्ष असून, अशोक पठारे हे अध्यक्ष आहेत. 
फुगे माने तालीम मंडळ दुर्गसंवर्धन या विषयावर देखावा करणार आहे. मंडळाचे हे ६९ वे वर्ष आहे.  

पिंपरी गावातील अमर दीप तरुण मंडळाचे हे २८ वे वर्ष असून, मंडळ आकर्षक विद्युत रोषणाई करणार आहे. माजी महापौर संजोग वाघेरे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.  
आकुर्डी काळभोर नगर येथील राष्ट्रतेज तरुण मंडळ यावर्षी पंढरीची वारी या विषयावर जिवंत देखावा करणार आहे. मंडळाचे हे ३६ वे वर्ष आहे.

आकुर्डी चौकातील तरुण मित्र मंडळ प्रणित सदभावना प्रतिष्ठान यावर्षी आकर्षक गणेश महाल साकारणार आहे. मंडळाचे हे ५२ वे वर्ष असून, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत 
 
मराठा आरक्षणावर देखावा
 कुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मंडळ यावर्षी मराठा क्रांती मोर्चा व मराठा आरक्षण यावर आधारित शक्ती व सहनशक्ती हा देखावा साकारणार आहे. मंडळाचे हे २६ वे वर्ष असून, शिवाजी सुर्यवंशी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.