Wed, Jun 26, 2019 17:31होमपेज › Pune › अष्टद्वार सोसायटीत रंगला ‘खेळ पैठणी’चा

अष्टद्वार सोसायटीत रंगला ‘खेळ पैठणी’चा

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 1:19AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

लग्नातल्या उखाण्यांची ठसक...., तळ्यात-मळ्यातल्या जोरदार उड्या...., लल्लाती भंडार.., या गाण्यांवर महिलांनी नाचण्याचा घेतलेला आनंद..., रस्सीखेचची रंगलेली स्पर्धा.., त्यातून ओसंडून वाहणारा महिलांचा उत्साह..., ग्रुप बनविण्याच्या स्पर्धेतील महिलांची चढाओढ, याबरोबरच फुगे फोडणे आणि बादलीत अचूक नेम धरून चेंडू फेकण्याची स्पर्धा..., त्यामधून अनेक महिलांनी चढलेली गुणांची शिडी आणि अखेरच्या संगीत खुर्चीच्या सामन्यात एकमेकींना दिलेली जोरदार टक्कर.., अशा विविध खेळांचा आनंद घेत अष्टद्वार गणेश सोसायटीत रंगला ‘खेळ पैठणी’चा. निमित्त होते, दैनिक ‘पुढारी’, कात्रज दूध, संकल्प एज्युकेशन व शेवानी सारीज यांच्या संयुक्त विद्यमाने अष्टद्वार गणेश सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी येथे आयोजित ‘खेळ गृहलक्ष्मी’चा या कार्यक्रमाचे.

या वेळी एकापेक्षा एक रंगलेल्या या बहारदार स्पर्धेत सहभागी होऊन यशाचे शिखर गाठत साधना हिंगमिरे यांनी पैठणीचा मान मिळविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धक हिंगमिरे यांना पैठणी देण्यात आली. या वेळी संकल्प एज्युकेशनच्या संचालिका चेतना बिडवे, कात्रज डेअरीचे पांडुरंग कोंढाळकर, गायक अमेय बारटक्के व अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अष्टद्वार मंडळाच्या अध्यक्षा हर्षा मोरे, जोत्स्ना परदेशी यांनी केले होते. अखेरपर्यंत रंगलेल्या ‘खेळ गृहलक्ष्मीचा’ या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. सोसायटीमधील सर्वच महिला या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कात्रज डेअरीचे मार्केटिंग अधिकारी कुमार मारणे यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात खुमासदार उखाणे घेत झाली. एकापेक्षा एक बहारदार उखाण्यांचा जणू रंगमंचावर पाऊसच पडला. कार्यक्रमाचा पहिला खेळ तळ्यात-मळ्यात होता. यात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. मात्र, वेळेवर अचूक उडी न घेता आल्याने अनेक महिला बाद झाल्या; तर काहींना पुढील फेरीसाठी निवडण्यात आले. तळ्यात-मळ्यात खेळ चांगलाच रंगला. त्यानंतर दुसर्‍या खेळाला सुरुवात झाली. यात ठरलेल्या नंबरप्रमाणे गाणे संपल्यानंतर महिलांनी जोड्या तयार करायच्या होत्या. याप्रसंगी हा खेळ खेळतानादेखील महिलांचा उत्स्फूर्त उत्साह पाहायला मिळाला.

त्यानंतर काही मिनिटांसाठी ब्रेक घेत ‘लल्लाती भंडार’ या गाण्यावर नाचत महिलांनी परिसरात धम्माल उडवून दिली. तिसरा खेळ मात्र महिलांसाठी मोठ्या कसरतीचा ठरला. यात रस्सी ओढण्याची कसरत करत अनेक महिलांनी अंतिम सामन्यासाठी गुणांची शिडी चढली. याबरोबरच फुगे फोडणे आणि बादलीत चेंडू फेकणे, हे मनोरंजनात्मक खेळदेखील या वेळी घेण्यात आले. त्यानंतर आयोजित अखेरचा संगीत खुर्चीचा सामना जोरदार रंगला. संगीत खुर्चीचा सामना पाहताना सर्वांच्या मनात धस्स झाले होते. मात्र, झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाप्रमाणे संगीत खुर्चीमध्येही यश मिळवत हिंगमिरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सविता कडू यांनी द्वितीय क्रमांक, ज्योती नलावडे यांनी तृतीय क्रमांक, नेहा चौधरी यांनी चौथा क्रमांक; तर सुनीता तावरे यांनी पाचवा क्रमांक पटकावला. या वेळी इतर अकरा विजेत्यांना कात्रज डेअरीच्या वतीने दुग्धजन्य पदार्थांचे वाटप करण्यात आले.