होमपेज › Pune › तृतीय पंथीयांनी घेतला पोस्टासाठी पुढाकार!

तृतीय पंथीयांनी घेतला पोस्टासाठी पुढाकार!

Published On: Jan 26 2018 1:23AM | Last Updated: Jan 25 2018 10:27PMपिंपरी : प्रतिनिधी

बोपखेलकरांचा रस्ता बंद झाल्यानंतर त्यांचे अतोनात हाल होण्यास सुरुवात झाली. प्रशासकीय सेवा देखील काहीशी विस्कळीत झाली. गावात पोस्ट कार्यालय नसल्याने गावकर्‍यांना गैरसोईला सामोरे जावे लागते. अनेकांना नोकरीची पत्रे येतात; परंतु वेळेवर न मिळाल्याने अडचणी निर्माण होतात. हे सर्व टाळण्यासाठी बोपखेलमधील तृतीय पंथीयांनी गावात पोस्ट कार्यालय होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

लष्कराच्या हद्दीतून जाणारा रस्ता अडीच वर्षांपूर्वी बंद झाल्याने बोपखेलकरांचे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाचे, उद्योग-व्यवसायाचे प्रश्‍न आ वासून उभा राहिले. पैसे असलेल्या पालकांनी त्यांची मुले इतरत्र शाळेत दाखल केली; परंतु सर्वसामान्यांची मुले दापोडीतच शाळेत शिक्षण घेतात; परंतु त्यासाठी त्यांना मोठा प्रवास करून यावा लागतो. या सर्व प्रश्‍नांबरोबरच पूर्वी दापोडी-सीएमईत असलेल्या पोस्ट कार्यालयातून बोपखेलला पत्रे पोच होत असत; परंतु आता रस्ता बंद झाल्यानंतर अनेक वेळा पोस्टमन एवढा मोठा रस्ता सायकलवर फिरून बोपखेलला जाण्याचे टाळतात; किंवा इतरांच्या हाती पत्रे पाठवली जातात. अनेक वेळा ही पत्रे उशिरा मिळतात. शिवाय गावातील नागरिकांना पोस्टात व्यवहार करण्यासाठी देखील दापोडीमध्ये यावे लागते.

हे सर्व टाळण्यासाठी गावात पोस्ट कार्यालय होण्यासाठी बोपखेलमधील माय माउली या तृतीय पंथीयांनी सुरू केलेल्या प्रतिष्ठानच्या वतीने पाठपुरावा सुरू केला आहे. 

रस्ता बंद झाल्यापासून गावकर्‍यांची कोंडी झाली आहे. पोस्ट कार्यालयात काही काम असेल, तर त्यासाठी अर्धा दिवस तरी खर्च करून जावे लागते. वेळ आणि पैसा दोन्ही जातात. यामुळे बोपखेलमध्येच पोस्ट कार्यालय होण्याची आमची इच्छा आहे. यामुळे गावातील 25 हजार नागरिकांचा प्रश्‍न सुटेल. - रूपेश तेजी, अध्यक्ष- माय माउली प्रतिष्ठान