Fri, Apr 19, 2019 08:05होमपेज › Pune › चोर-पोलिसांचा खेळ वाकडमध्ये सुरूच

चोर-पोलिसांचा खेळ वाकडमध्ये सुरूच

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 12:57AMवाकड : संतोष शिंदे 

गेल्या काही महिन्यांपासून वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोर-पोलिसांचा खेळ सुरू आहे. चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देत अगदी सहजपणे चोर्‍या करीत आहेत. पोलिस मात्र चोरी झाल्यानंतर खडबडून जागे होत. तपास करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे. चोर- पोलिसच्या खेळाला सामान्य जनता मात्र पुरती वैतागली आहे.शहरातील एक ‘हेवी’ पोलिस ठाणे अशी वाकडची ओळख आहे. या पोलिस ठाण्यात बदली करून घेण्यासाठी अधिकारी देखील तसाच असावा लागतो. त्यामुळेच सध्या वाकडच्या पोलिस ठाण्याला शोभतील असे अनुभवसंपन्न अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहेत. परंतु या अधिकार्‍यांना हद्दीवर म्हणावी अशी पकड अद्याप मिळवता आली नाही. 

त्यांच्या निष्क्रियतेमुळेच चोरट्यांचे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर फावले आहे. महिन्याभरात तीसपेक्षा जास्त चोरी प्रकारातील गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये घरफोड्या, वाहनचोरी,दरोडा, मंगळसूत्र हिसकवण्याच्या घटनांसह इतरही छोट्या मोठ्या चोरीच्या घटनांचा समावेश आहे. घराबाहेर पार्क केलेल्या दुचाकी चोरट्यांच्या लक्ष्य बनत आहेत. बंद घरांवर पाळत ठेऊन घरफोड्या केल्या जात आहेत. दुकानांचे शटर उचकटून हात साफ केला जात आहे. या वाढत्या प्रकारांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. चोरट्यांच्या धसक्यामुळे शाळांना सुट्ट्या असूनही पालक मुलांना घेऊन बाहेरगावी जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. घराबाहेर ठेवलेल्या छोट्या वस्तूंची तक्रार घेऊन नागरिक पोलिस ठाण्यापर्यंत जात नाही.  अशा नोंद नसलेल्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. 

घडणारे आणि उघड होणार्‍या गुन्ह्यांच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असली तरी पोलीस मात्र उघड झालेल्या गुन्ह्यातच समाधान मानत आहेत. चोरी झाल्यानंतर चोरटे पकडल्यापासून ते न्यायालयाच्या आदेशानुसार मुद्देमाल ताब्यात मिळेपर्यंत एक मोठी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेला सामोरे जात असताना फिर्यादीला मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे गुन्हे उघड करण्यापेक्षा त्यावर अंकुश मिळवणे नागरिकांना अपेक्षित आहे. अंतर्गत कॉलन्यामध्ये गस्त वाढवण्याची मागणी यापूर्वीही अनेकदा करण्यात आली होती. परंतु तरी देखील मुख्य रस्त्यांच्या तुलनेत अंतर्गत रस्त्यांवर गस्तीचे प्रमाण कमी आहे.

Tags : Pimpri, Thieves, police, play,  quack