Fri, Jul 19, 2019 15:51होमपेज › Pune › यंदा दहा हजार गाथा होणार उपलब्ध

यंदा दहा हजार गाथा होणार उपलब्ध

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 30 2018 1:13AMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

शेकडो वर्षांची परंपरा असलेला पालखी सोहळा आजच्या आधुनिक सोयी-सुविधांच्या काळात जगासाठी केवळ कुतुहलाचा विषय राहिला नाही; तर अभ्यासाचा विषय ठरू लागला आहे. केवळ पांडुरंगाच्या ओढीने भारलेले लाखो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होऊन शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास आनंदाने करतात. वारीच्या वाटेवर ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा नामघोष आणि संतांच्या अभंगांचे गायन हेच त्यांचे उर्जास्त्रोत ठरतात. म्हणून संतांच्या ओव्या, भजने आणि अभंग असलेल्या ग्रंथसंपदेला या काळात मोठी मागणी असते. सोहळ्यात तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथाचा तुटवडा होणार नाही यावर संस्थानकडूनही विशेष लक्ष दिले जाते. यावर्षी गाथेच्या दहा हजार प्रती उपलब्ध होणार असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा गाथा जागतिक पातळीवर अभ्यासकांना भूरळ घालीत आहे. ‘तुकाराम इज नॅशनल पोएट’ अशा शब्दांत सर अलेक्झांडर ग्रांट यांनी महाराजांचे वर्णन केले आहे. महाराजांच्या अभंगाचा गाथा महाराष्ट्राच्या घराघरात पोचला आहे. किंबहुना अलीकडच्या काळात तर लग्नसोहळे, वाढदिवस किंवा कुठल्याही आनंदाच्या सोहळ्यात श्री संत तुकाराम महाराजांचा अभंगाचा गाथा भेट स्रूपात देण्याचा प्रघात रूढ होत चालला आहे. सप्ताह सोहळे आणि पारायणांतही गाथा भेट दिल्या जातात. महाराजांच्या देहूत आल्यावर अभंगाच्या गाथेचे विचारधन खरेदी करण्यावर भाविकांचा भर दिसून येतो. 

सातत्याने वाढत्या मागणीमुळे गाथांची वारंवार छपाई करावी लागते. 5 जुलै रोजी पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर संस्थानने आणखी दहा हजार प्रतींची छपाई करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. पुढील दोन दिवसांत त्या उपलब्ध होतील, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख सुनील दामोदर मोरे यांनी दिली. देहू-पंढरपूर आणि पुन्हा परतीच्या प्रवासातही दरवर्षी सुमारे चार ते पाच हजार गाथांची खरेदी होते. हा आकडा केवळ संस्थानच्या शासकीय प्रतीचा आहे. एकंदरीतच, वारीत हजारो गाथांची खरेदी केली जाते. 

शासकीय छापील गाथेचा आजवरचा प्रवास : 

संत तुकाराम महारजांच्या अभंगाच्या गाथेच्या छपाईचा प्रवास मोठा रोचक अहे. सन 1869 व 1873 मध्ये या अभंगाचा गाथा दोन भागात प्रकाशित झाला. इंदुप्रकाश प्रेसचे जनार्दन सखाराम गाडगीळ यांनी आपल्या प्रेसमध्ये तो सर्वप्रथम छापला. त्यासाठी मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन सर अलेक्झांडर ग्रांट यांच्या शिफारशीवरून सरकारने छपाईसाठी 24 हजारांची निधी दिला होता. त्यानंतर 1950 मध्येही शासकीय निधी मिळाला होता, असे सरकारी गाथेत उल्लेख आढळतात. सन 2000 मध्ये श्री संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमनाचा त्रिशतकोत्तर सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकारातून 25 लाखांचा निधी गाथा छपाईसाठी देण्यात आला. या निधीवर जवळपास 35 हजारहून अधिक गाथा 50 रूपयांच्या वाजवी किंमतीत भाविकांना उपलब्ध झाल्या. मागील दोन वर्षांपासून कागदाच्या किंमती वाढल्यामुळे गाथाची किंमत वाढली आहे; मात्र, तरीही भाविकांतून मागणी कायम आहे.