Sun, May 26, 2019 10:37होमपेज › Pune › पुण्यात पुन्हा प्रीपेड रिक्षा होणार सुरू

पुण्यात पुन्हा प्रीपेड रिक्षा होणार सुरू

Published On: May 18 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 1:18AMपुणे : प्रतिनिधी

पुणेकरांसाठी शहरात चार ठिकाणी प्रीपेड रिक्षा सर्व्हिस चालू करण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेट व संगमवाडी या चार ठिकाणी प्रीपेड रिक्षा सेवा पुन्हा सुरू करण्यासंबंधी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी संघ, पुणेतर्फे स्वारगेट व शिवाजीनगर येथून डिजिटल पद्धतीने ही सेवा आजपासून सुरू करण्यात येणार आहे. 15 दिवस प्रायोगिक तत्त्वावर चालू केल्यानंतर दि. 1 जूनला स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे रेल्वे स्टेशन येथून कायमस्वरूपी प्रीपेड रिक्षा सेवा सुरू कारणात येणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. यापूर्वी अनेक वेळा ही सेवा सुरू केली, परंतु काही ना काही कारणांमुळे ती बंद करण्यात आली. यावेळी पूर्णपणे डिजिटल पद्धतीने प्रीपेड सेवा सुरू करण्यात येणार असून प्रवाशांची सुरक्षा ठेवण्यात आली असून, अचूक भाडे आकारले जाईल. प्रीपेड रिक्षासाठी त्रेताकल्प या स्टार्टअपने वेबसाइट तयार केली आहे.

या सेवेमध्ये प्रवाशांना एसएमएसद्वारे रिक्षा चालकाचे सर्व डिटेल्स तसेच आकारलेले भाडे व नॅव्हिगेशन लिंक मिळेल, जेणेकरून पूर्णपणे पारदर्शकता राहील. संपूर्ण भारतामध्ये टेक्नॉलॉजिला सोबत घेऊन पहिलीच प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी संघ, पुणेतर्फे प्रादेशिक परिवहन व वाहतूक पोलिसांतर्फे संलग्नपणे राबविण्यात येणार असून रिक्षा चालक व प्रवासी या दोघांना याचा लाभ होणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.त्रेताकल्प या कंपनीने महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी संघासाठी संपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे. एका रिक्षा चालकाचा मुलगा असल्याकारणाने हा प्रकल्प हृदयाच्या खूप जवळ असल्याचे त्रेताकल्पचे सीईओ राहुल शितोळे यांनी सांगितले.

पुन्हा प्रीपेडचा प्रयोग यशस्वी होणार का?

शहरात 2002 साली पुणे स्टेशनवरून प्रायोगिक तत्त्वावर प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेचे कामकाज कमिटीमार्फत करण्यात येत होते. मात्र, तांत्रिक कारणामुळे सहा महिन्यांतच ही सेवा बंद पडली. पुन्हा नागरिकांच्या मागणीनुसार 2008 साली पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि स्वारगेट या ठिकाणांहून ही सेवा सुरू करण्यात आली. याचे कामकाज पाहण्यासाठी सामाजिक संघटना तसेच वाहतूक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पुढे यावे आणि ही प्रीपेड सेवा व्यवस्थित चालवावी यासाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र, त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनीच पुढाकार घेऊन ही प्रीपेड सेवा चालू राहण्यासाठी प्रयत्न केले. जेमतेम चार महिनेच वाहतूक पोलिसांना या सेवेवर लक्ष ठेवणे जमले. त्यानंतर मात्र ही सेवा पूर्णपणे बंद पडली. ही बाब लक्षात घेऊन प्रीपेड सेवेचे काम महिला बचत गटांना देण्याचा प्रस्ताव आरटीओने पुढे आणला होता. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने या प्रीपेड सेवेला गाशा गुंडाळावा लागला.