Thu, Aug 22, 2019 14:34होमपेज › Pune › मुख्य प्रवाहात येणार १५०० बाल गुन्हेगार

मुख्य प्रवाहात येणार १५०० बाल गुन्हेगार

Published On: May 16 2019 2:10AM | Last Updated: May 16 2019 1:34AM
पुणे : प्रतिनिधी
काय रे शाळेत जातो का?
उत्तर - नाही.
मग हे असले ‘उद्योग’ का करतोस? उत्तर - मग काय करणार? 
बाल गुन्हेगारीबाबत पुणे पोलिसांनी अभ्यास सुरू केला असता, अशी उत्तरे ठरलेली असायची. अशी 1506 मुले त्यांना सापडली. त्यांना गुन्हेगारी विश्‍वातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी वेगळा मार्ग चोखाळला आहे... संपूर्ण पुनर्वसनाचा.
शहरातील वेगवेगळ्या भागांतील बाल गुन्हेगारांची यादी करून, त्यांचे पालक, सामाजिक संस्था, मदत करणारे नागरिक आदींना सोबत घेऊन पोलिसांनी 47 बैठका घेतल्या आहेत. समुपदेशनाद्वारे त्यांचे मनपरिवर्तन केले जात आहे. त्यांना शाळेत पाठवण्यापासून ते त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्याबरोबरच सर्व पर्यायांवर विचार सुरू आहे. त्यासाठी चतु:सूत्री निश्‍चित केली आहे. या मुलांचे व्यवस्थित रेकॉर्ड ठेवणे, सर्व संबंधित घटकांच्या नियमित बैठका घेणे, त्यांचे समुपदेशन करण्याबरोबरच रचनात्मक पद्धतीने कौशल्य विकास करणे आणि नियमित पाठपुरावा करणे ही ती चतु:सूत्री आहे.
या बाल गुन्हेगारांच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत मदत मिळवून दिली जात आहे. प्रत्येक मुलाचे सात टप्प्यांमध्ये समुपदेशन आणि स्वयंप्रेरणा वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यांच्यातील अंगभूत कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक मदत पुरवली जात आहे. तसेच, विविध क्षेत्रांतील दिग्गजांशी त्यांचा संवाद घडवून आणण्याबरोबरच, क्रिकेट-फुटबॉल खेळांची त्यांना गोडी लागावी म्हणून सामन्यांचे आयोजन केले जाईल. त्यांना प्रबोधनपर चांगले चित्रपट दाखविण्याबरोबरच प्रेक्षणीय ठिकाणी सहली आयोजित केल्या जाणार आहेत. ही उपाययोजना दीर्घकालीन असली तरी त्यामुळे शहरामध्ये गुन्हेगारांची नवी पिढी तयार होणार नाही, समाजाची सर्जनशीलता वाढीस लागेल, असा विश्‍वास पोलिसांना आहे. पोलिसांकडून होत असलेला राज्यातील अशा स्वरूपाचा पहिला उपक्रम आहे.