Mon, Aug 19, 2019 05:27होमपेज › Pune › ‘पवित्र पोर्टल’वर नोंदणी नाहीच

‘पवित्र पोर्टल’वर नोंदणी नाहीच

Published On: Jul 04 2018 2:18AM | Last Updated: Jul 04 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात ज्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होणार आहे. त्या पोर्टलकडे राज्यातील दोन लाखांपेक्षा जास्त तरुण डोळे लावून बसले आहेत. मात्र पोर्टल सुरू होण्याची काही चिन्हे दिसेनात, त्यातच पवित्र पोर्टलचा सरकारी संकेतस्थळावर सोमवारी शुभारंभ करण्यात आला आहे. मात्र कोणालाही स्वत:ची नोंदणी त्यात करता येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिक्षक भरतीचे पोर्टल नेमके कधी सुरू होणार असा प्रश्‍न आता शिक्षक भरतीसाठी पात्र असलेले बेरोजगार तरूण विचारत आहेत.

राज्यात शिक्षक भरती ही केवळ पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येईल. असा शासनाने निर्णय घेतल्यानंतर तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त बेरोजगारांच्या नजरा पवित्र पोर्टल कधी सुरू होणार याकडे लागल्या आहेत. राज्याच्या शालेय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर पवित्र पोर्टलचा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्टाफ पोर्टल, शिक्षकांच्या बदल्यांचे ट्रान्सफ र पोर्टल, समायोजन पोर्टल आदी पोर्टलचे टॅब या संकेतस्थळावर अगोदरपासूनच उपलब्ध आहेत. आता त्यासोबतच ऑनलाईन शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या टॅब अंतर्गत जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका, खासगी व्यवस्थापनाच्या शाळा अशा लिंक देण्यात आल्या आहेत. उमेदवारांना ज्या व्यवस्थापनाच्या शाळेसाठी अर्ज करायचा आहे.ती लिंक निवडून त्यांना सविस्तर माहिती मिळवता येणार आहे. त्यासोबतच पवित्र पोर्टलचे व्यवस्थापन कशा पद्धतीने चालणार याची माहिती देणारी देखील लिंक देण्यात आली आहे. लिंक चालू झाल्यानंतर अनेक तरुणांनी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोर्टल पाहण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागले नाही. त्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली असून पोर्टल नेमके कधी सुरू होणार असा प्रश्‍न विचारला आहे.

पोर्टलसंदर्भात शिक्षण विभागातील सूत्रांनी मात्र वेगळीच माहिती दिली असून पवित्र पोर्टलचे सॉफ्टवेअर टेस्टींग आणि क्‍वालिटी चेकिंग (डढटउ) झालेले आहे. त्याचा अहवाल आलेला नसल्यामुळे पोर्टल सुरू केले नसल्याचे सांगितले. तसेच येत्या दोन ते तीन दिवसांत हे पोर्टल उमेदवारांसाठी आणि शाळा व्यवस्थापनासाठी सुरू करण्यात येणार आहे. पोर्टलसंदर्भातील माहितीपुस्तिका देखील काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.