Tue, Jul 16, 2019 13:36होमपेज › Pune › सायबर एक्सपर्ट्सची भरतीच नाही

सायबर एक्सपर्ट्सची भरतीच नाही

Published On: May 05 2018 1:21AM | Last Updated: May 05 2018 1:08AMपुणे : विजय मोरे 

शहर, उपनगर आणि जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. गेल्या तीन वषार्र्र्ंत तर पोलिसांकडे सुमारे दहा हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. असे असतानाही सरकारी सायबर एक्सपर्ट अधिकारी, कर्मचार्‍यांची भरतीच न झाल्याने, हे काम खासगी व्यक्तींकडून केले जात आहे. यामुळे पोलिसांच्या अत्यंत गोपनीय माहितीचे उल्लंघन होत असल्याने राज्य शासनाने सायबर एक्सपर्टची नेमणूक करणे गरजेचे ठरले आहे. 

एकूणच गुन्हेगारीमध्ये सध्या सायबर क्राईमचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विशेषत: तरुणाई या गुन्ह्यांकडे वळू लागली आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट, एटीएम कार्ड फ्रॉडच्या गुन्ह्यांचा आलेख तर प्रचंड उंचावला आहे. गेल्या वर्षीच शहरात याप्रकरणी एकूण तीन हजार तक्रारी आल्या आहेत. सायबर क्राईममध्ये लॉटरी, कर्ज, ऑनलाईन बिझनेस, इन्शुरन्स, मनी ट्रान्सफर, व्हिसा आदी अठरा प्रकारचे फ्रॉड येतात. सध्या तरुणाई फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या प्रचंड आहारी गेली आहे. यातूनच फेक प्रोफाईल, फेसबुक हॅकींग, बदनामीकारक मजकूर लिहिणे, अश्‍लील व्हिडिओ अपलोड करणे, फेक मेल तयार करून, समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण, ट्वीट करणे आदी बारा प्रकारचे सोशल नेटवर्किंग क्राईममध्ये गुन्ह्यांचे प्रकार आहेत. त्याच्या तक्रारीतही वाढ होत आहे. 

दरम्यान सायबर क्राईममध्ये एकूण 49 प्रकारचे गुन्हे येतात. यामध्ये डाटा हॅकिंग करण्याचे गुन्हे सातत्याने घडतात ही एक गंभीर बाब आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानी हॅकर्सनी, जम्मूतील सैन्य दलाची एक साईट हॅक केल्याचा धक्‍कादायक प्रकार घडला होता. पुण्यातही गेल्या वर्षात हॅकिंगच्या सुमारे 30 तक्रारी दाखल झाल्या होत्या. अशातच दिवसेंदिवस सायबर क्राईममध्ये प्रचंड वाढ होत असतानाच पोलिसांकडे या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वत:ची अशी यंत्रणाच नसल्याचे वास्तव पाहावयास मिळते आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ही परिस्थिती असेल, तर ग्रामीण पोलिसांची काय स्थिती असेल, याचा विचार केला तर या सायबर क्राईमचा पोलिसांकडून कसा तपास केला जात असेल याची जाणीव होते. 

राज्य शासनाने सायबर क्राईमकडे गांभीर्याने पाहणे आता गरजेचे ठरते आहे. कारण या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी खासगी सायबर एक्सपर्टवरच पोलिसांना अवलंबून रहावे लागत आहे. विशेष म्हणजे यामुळे पोलिसांकडील अत्यंत गोपनीय माहिती खासगी व्यक्तीच्या हाती जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या गुन्ह्यांचा तपास करताना तपास करणार्‍या अधिकार्‍यांना अनेकांचे फोन टॅपिंग करावे लागतात. यामध्ये नेते, कुख्यात गुन्हेगारांचा समावेश असतो. यामुळे याची संपूर्ण गोपनीय माहिती या खासगी सायबर एक्सपर्टच्या हाती जात असते. ठाणे पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी अटक केलेल्या खासगी गुप्तहेर रजनी पंडित हिने लाखोर रुपये घेऊन सीडीआर विकल्याची माहिती उघड झाली होती.

सायबर क्राईमचा तपास करण्यासाठी पोलिसांना खासगी एक्सपर्टवर अवलंबून रहावे लागत असल्याने, या एक्सपर्टचा वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांवर एक प्रकारचा मोठा रूबाब असतो. विशेषतः हे लोक आयटी क्षेत्रातील असल्याने त्यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असते. याच जोरावर हे एक्सपर्ट आयपीएस लॉबीवर प्रभाव टाकतात. याच प्रभावातून हे खासगी एक्सपर्ट पोलिसांकडील आपली खासगी कामे करवून घेण्यातही मागे पुढे पहात नाहीत. एका अतिवरिअष्ठ अधिकार्‍यांचा एक खासगी सायबर एक्सपर्ट प्रचंड लाडका म्हणून पोलिस दलात ओळखला जातो. याचाच फायदा उठवत देशातील अनेक पोलिसांना मार्गदर्शन करण्याची त्याला संधी मिळाली.  वरिष्ठांकडे विशेष निधी मोठ्या प्रमाणावर असतो. या निधीचा यासाठी वापर करीत असतात.

यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, खासगी सायबर एक्सपर्टवर अवलंबून राहण्याऐवजी स्वत:ची यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. खासगी सायबर एक्सपर्टमुळे एकूणच गोपनीयतेचा भंग होतो. एखाद्या न्यायप्रविष्ट गुन्ह्यात न्यायालयसुध्दा तपास अधिकार्‍याकडे केस डायरी मागू शकत नाही, एवढी पोलिस तपासात गोपनीयता पाळली जाते. सायबर क्राईमध्ये तपास करताना, खासगी व्यक्तीच जर तपास यंत्रणेत सहभागी होत असतील, तर ती एक गंभीर बाब आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

सायबर क्राईमच्या  व्यापकतेमुळे याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असताना, खासगी व्यक्तीची तपासतील लूडबूड बंद होणे गरजेचे आहे. त्यामुळेच खसगी हॅकर्स, सॉफ्टवेअर आणि सायबर एक्सपर्ट हे पोलिस दलातीलच असणे गरजेचे आहे. राज्य शासनाचा इथिकल हॅकिंग कोर्स अभ्यासक्रम चालविला जातो. याच अभ्याक्रमातून बाहेर पडलेल्या तज्ज्ञांची भरती केली तर या बोगस खासगी सायबर एक्सपर्टवर अवलंबून राहण्याची गरजच राहणार नाही, असेही त्या वरिष्ठांनी सांगितले.