Sun, Apr 21, 2019 05:48होमपेज › Pune › पालिका स्तरावर अद्याप नियोजन नाही

पालिका स्तरावर अद्याप नियोजन नाही

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 10:30PMमुंढवा : नितीन वाबळे

पुणे - मिरज रेल्वेमार्गावरील वैदूवाडी-रामटेकडी येथे रेल्वेगेट आहे. रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट असल्याने येथे अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. टँकर भरणा केंद्र व रोकेम कचरा प्रकल्पामुळे पाण्याचे टँकर व कच-याच्या वाहनांबरोबरच स्थानिक नागरिक व कंपन्यांतील कामगारांची या रेल्वेगेटवरून वर्दळ असते. येथे भुयारी मार्ग किंवा उड्डापुलाची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप पुणे मनपा स्तरावर याविषयी काहिच नियोजन नसल्याचे दिसून येत आहे. 

रामटेकडी परिसरामध्ये एसआरए प्रकल्पाच्या तीन इमारती उभ्या राहिल्या आहेत. येत्या काहि वर्षात आणखी काही प्रकल्प उभे राहणार आहेत. येथे औद्योगीक वसाहत असल्याने कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रामटेकडी येथीव मुख्य रस्ता अरूंद आहे. त्यामुळे रेल्वेगेट लागल्यावर या रस्त्यावर वाहने अडकून पडत आहेत. स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. 

सोलापूर रस्त्यावरील बीआरटी मार्गावर होणा-या वाहतुककोंडीमध्ये अडकून पडण्याऐवजी काळेपडळ, ससाणेनगर तसेच हांडेवाडी रोडकडून पुणे शहराकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून येथील रस्त्याचा वापर केला जातो. कामगारवर्ग स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी वर्गही या रस्त्याचा नियमित वापर करतात. मात्र, रेल्वेगेट लागल्यानंतर वाहतूककोंडी होऊन स्थानिकांबरोबरच वाहनचालकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे उड्डाणपुल किंवा भूयारी मार्ग करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक असल्याचे येथील नागरिकांनी सांगीतले.

पालिका प्रशासनाने काळेपडळ व ससाणेनगर तसेच ससाणेनगर व रामटेकडी या दोन रेल्वेगेट मधून भूयारी मार्गाचे नियोजन केले आहे. येथे भूयारी मार्ग अस्तिवात आल्यावर रामटेकडी रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडीमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने येथेही उड्डाणपूल किंवा भूयारी मार्गाचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, तसे कोणतेही नियोजन न केल्यामुळे रामटेकडी रेल्वेगेटवर वाढणा-या वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.       - आनंद आलकुंटे, नगरसेवक

रामटेकडी येथील मुख्य रस्ता अरुंद आहे. येथील रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना वर्दळीसाठी अडचणीचे ठरत आहे. येथील रल्वेगेटवर उड्डानपुल किंवा भूयारी मार्ग उभारण्यासाठी स्थायी समितीने अंदाजपत्रकात तरतुद करणे आवश्यक होते. मात्र, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे.      - अशोक कांबळे, नगरसेवक