Fri, May 24, 2019 02:39होमपेज › Pune › बारामतीत बालकांचे मृतदेह पुरण्यास जागाच नाही!

बारामतीत बालकांचे मृतदेह पुरण्यास जागाच नाही!

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 05 2018 12:20AMबारामती : अनिल सावळे-पाटील

देशभर विकासाच्या ‘मॉडेल’चा गवगवा झालेल्या बारामती शहरात बालकांचे मृतदेह पुरण्यास जागाच नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. शहरातील देसाई इस्टेट परिसरात निरा डावा कालव्याच्या भरावामध्ये खड्डा खोदून बालकांचे मृतदेह नाइलाजाने पुरले जात आहेत. नगरपरिषद प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
ही घटना वारंवार होत आहे, हे दुर्दैवी आहे. यापुढे असे प्रकार होऊ नये, यासाठी दखल घेऊ व मृत बालके व अर्भक पुरण्यासाठी इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊ, असे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सांगितले. ही घटना आजच मला कळली आहे. त्याची पूर्णपणे माहिती घेऊन त्याठिकाणी असे प्रकार होऊ देणार नाही. त्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने कर्मचारी नियुक्त करू. यापुढे असे प्रकार होऊ नये, यासाठी इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊ असे बारामती नगरपरिषद मुख्याधिकारी योगेश कडूस्कर यांनी सांगितले 

जळोची ग्रामपंचायत असताना अनेक वर्षांपासून देसाई इस्टेटमधील निरा डावा कालव्याच्या भरावामध्ये लहान मुलांचे मृतदेह खड्डे खणून पुरले जातात. तो मृतदेह भटक्या कुत्र्यांनी  उकरून खाऊ नये, यासाठी दोन रात्रभर त्या ठिकाणी नातेवाईक पहारा देतात. हा प्रकार अनेक वर्षांपासून होत आहे. तरी नगरपालिकेच्या लक्षात ही गंभीर बाब अद्याप आलेली नाही. मध्यंतरीच्या काळात बारामतीच्या विकासाचा नारा देशभर गाजविण्याचे काम पवार कुटुंबियांनी केले आहे. परंतु नगरपालिकेचे मात्र या प्राथनिक बाबीकडे पुर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. 

फार पुर्वी देसाई इस्टेटचा हा भाग हा जळोची ग्रामपंचायतीचा शेवटचा भाग होता. सर्व परिसर चिखलमय, रस्ता नाही, त्यामुळे तुरळक लोकवस्ती असल्याने मोठ्या प्रमाणावर बारामती शहरातील मृत बालकांचे मृतदेह पुरण्याचे प्रकार येथे होत होते; परंतु बारामती नगरपरिषदमध्ये जळोची ग्रामपंचायत आल्यावर तरी हा प्रकार थांबवा आणि नगरपालिकेने स्वतंत्र व्यवस्था करावी म्हणून अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी मागणी केली.

नगरपरिषदेने सोय करावी : बालगुडे

हा प्रकार बंद व्हावा म्हणून नगरसेवक झाल्यापासून 2 ते 3 वेळा स्थानिक नगरसेवक म्हणून पाठपुरावा केला आहे. यासाठी प्रसंगी अजित पवार यांनाही भेटू, परंतु देसाई इस्टेटमधील नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही व नेहमी त्यांच्या पाठीशी असणार असल्याचे स्थानिक नगरसेवक अतुल बालगुडे यांनी सांगितले.