Sat, Jul 20, 2019 23:24होमपेज › Pune › मराठी पाट्यांना स्थानकांवर स्थानच नाही

मराठी पाट्यांना स्थानकांवर स्थानच नाही

Published On: Mar 11 2018 1:02AM | Last Updated: Mar 11 2018 12:26AMपुणे : निमिष गोखले

राज्य सरकारने राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये हिंदी, इंग्रजीसह मराठी भाषेचा वापर बंधनकारक केला आहे. दि. 7 डिसेंबर 2017 रोजी राज्य सरकारने  रेल्वे, बँक, टपाल, विमानतळ, मेट्रो आदी सरकारी कार्यालयांसह स्थानकांवर मराठीचा वापर सक्तीचा करण्यात यावा, असे सांगितले होते. या आदेशाला तीन महिन्यांहून अधिकचा काळ लोटला असूनही मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने राज्य सरकारचा हा आदेश पाळला नसून, पायदळी तुडवल्याचे सद्यःस्थितीवरून दिसून येत आहे. 

पुणे विभागांतर्गत येणार्‍या रेल्वे स्थानकांवरील पाट्या, डिस्प्ले बोर्डवरील मजकूर अद्यापही हिंदी व इंग्रजीत झळकत असून, रेल्वेचा मराठी भाषेविषयी असणारा द्वेष या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. शिवाजीनगर स्थानक, पुणे रेल्वे स्थानक, लोणावळा स्थानक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय (डीआरएम ऑफिस) या ठिकाणांसह बहुतांश ठिकाणी हिंदी व इंग्रजी पाट्या आहेत, मात्र ज्या मुलुखाची प्रादेशिक भाषा मराठी आहे, त्या भाषेला मात्र स्थानच देण्यात आलेले नाही, असे चीड आणणारे चित्र दिसत आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृतपणे राजभाषा आहे. 

महाराष्ट्र ऑफिशियल लँग्वेजेस अ‍ॅक्ट 1964 व अमेंडमेंट अ‍ॅक्ट 2015 नुसार सरकारी कामकाजामध्ये मराठीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील त्याचा सर्रासपणे वापर होताना दिसत नसून, मनमानी कारभाराप्रमाणे हिंदी व इंग्रजीचा वापर केला जातो. रेल्वे स्थानकांवरील पाट्या व रेल्वे कार्यालयामधील कामकाज तीन भाषांमध्ये (ट्राय लँग्वेज फॉर्म्युला) असावे, असा नियम आहे. मात्र, गेंड्याची कातडी असणारे रेल्वे प्रशासन कुणालाही भीक घालत नसल्याचे धक्कादायक चित्र दिसून येते. दरम्यान, राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात न आल्याने रेल्वेच्या पुणे विभागावर काय कारवाई करण्यात येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

पुणे रेल्वे स्थानकावर मराठी पाट्या जिथे-जिथे नाहीत, अशा ठिकाणांची पाहणी करण्यात येईल. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी याबाबत चर्चा करण्यात आली असून, अंमलबजावणी करण्यात येईल.      - ए. के. पाठक, स्टेशन डायरेक्टर,  पुणे स्थानक

येत्या 15 दिवसांत जिथे-जिथे मराठी पाट्या नसतील, तिथे-तिथे त्या बसविण्यात येतील.  मराठी पाट्या बसविण्यास माझी परवानगी घेण्याची गरज नाही, असेही सूचित केले आहे.  - मिलिंद देऊस्कर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक