Fri, Jul 19, 2019 20:11होमपेज › Pune › पर्यावरणाच्या नावाखाली विकासाला विरोध नको

पर्यावरणाच्या नावाखाली विकासाला विरोध नको

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 12:43AMपुणे : पांडुरंग सांडभोर

पर्यावरण की विकास नक्की कशाला प्राधान्य द्यायचे हा प्रश्‍न नेहमीच उभा राहतो. मात्र, अलिकडच्या काळात पर्यावरणाच्या नावाखाली उठसुठ विकासकामांना विरोध करण्याचे उद्योग सुरू आहेत. विरोध करणारी हीच मंडळीं पर्यावरण रक्षणाच्या इतर कामांमध्ये मात्र मागे दिसतात. नदीपात्रातील मेट्रोला हिरवा सिग्नल देऊन राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरणपुरक विकासकामांचा एक नविन संदेश दिला आहे. त्याचे भान सर्वांनी राखण्याचे गरज आहे. 

पुणे मेट्रो प्रकल्पातील वनाज कोथरूड ते रामवाडी या मेट्रोचा जो 1.4 किमीचा मार्ग नदीपात्रातून जातो, या मार्गाला शहरातील पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) या नदीपात्रातील मेट्रोला ग्रीन सिग्नल दिल्याने आता पुण्याची मेट्रो खर्‍या अर्थाने सुसाट धावू शकणार आहे. दिवसोंदिवस वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणेकरांसाठी हा मोठा दिलासा आहे. गेल्या काही वर्षात पुणे शहराची वाढ वेगाने सुरू आहे. त्याचा परिणाम येथील साधन सुविधांवर होऊ लागला आहे. वाढत्या नागरिकरणाच्या तुलनेने येथील पायाभूत सुविधा काही वाढू शकल्या नाहीत. प्रामुख्याने वाढती लोकसंख्या पुरेसी सार्वजनिक व्यवस्था उपलब्ध होऊ न शकल्याने वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यावर आता उपाय योजना म्हणून मेट्रोसारखे सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय पुढे आला आहे. मात्र, राजकिय साठमारी आणि प्रशासकिय अनास्था यात ती दहा वर्षे अडकली. त्यावर मात करीत मेट्रोच्या कामाला सुरवात झाली. मात्र, पुढे त्यास पर्यावरण वाद्यांनी अडथळा आणला. नदीपात्रातून जो मेट्रोचा मार्ग जातो, त्यास या पर्यावरणवाद्यांनी विरोध करीत एनजीटीत याचिका दाखल केली. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाबाबत पुन्हा सांशकता निर्माण झाली होती. मात्र अखेर एनजीटीनेच या मार्ग सुकर केला आहे. 

हे केवळ मेट्रोप्रकल्पा पुरते मर्यादित नाही, तर शहरातील अनेक नागरिकांच्या दृष्टीने असलेले प्रकल्प पर्यावरणाच्या नावाखाली अडकले आहेत. विठ्ठलवाडी ते वारजे हा नदीपात्रातील हा तयार केलेला रस्ता उखडून टाकावा लागला. बालभारती ते पौड रस्ता हा रस्ता याच कारणांमुळे रखडला, अशा महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. नदी संवर्धन प्रकल्पातही हाच अडथळा ठरण्याची भीती आहे.

खरतर पर्यावरणाचे रक्षण व्हायलाच पाहिजे यावर कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, गेल्या काही वर्षात सरधोपटपणे पर्यावरणाच्या नावाखाली विकासकामांमध्ये अडथळा आणण्याचे उद्योग काही मंडळींनीकडून सुरू आहेत. पर्यावरणाच्या नावाखाली काही मंडळीनी नदीपात्रातील मेट्रोला अडथळा आणला, त्यांनी खासगी वाहनांमुळे होणारे ध्वनी व वायु प्रदुषण किती वाढते याचाही विचार करण्याची गरज आहे. बालभारती ते पौडरस्ता हा रस्ता अस्तित्वात आला असता तर विधी महाविद्यालय, एसएनडीटी या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रदूषण कमी झाले असते, त्यामुळे नक्कीच पर्यावरण वाचविण्यास मदत झाली असती. मात्र, विरोध करणारी मंडळी केवळ एकाकी बाजुनेच विचार करत असल्याचे चित्र आहे. खरतर तर विरोधामागील त्यांची भावना नक्कीच प्रामाणिक असेल मात्र विरोध करण्यापेक्षा विकासकामेही होतील आणि पर्यावरणही वाचेल यासाठी उपाय योजना सुचविण्याचे आणि त्यामार्गी लागत आहेत की, नाही याकडे यामंडळींनी लक्ष देण्याची गरज आहे.

पर्यावरणाच्या नावाखाली उटसुट विकासकामांना अडथळा ठरणार्‍या मंडळींनी किमान ती वाचविण्यासाठी तरी पुढे येण्याची गरज आहे. मात्र, तसे काही होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यावरणाच्या नावाखाली सुरू असलेले उद्योग थांबवून व्यवहारिक निर्णय घेण्याची गरज आहे.