Tue, Mar 26, 2019 23:56होमपेज › Pune › पंधरा वर्षांत एकही नवीन प्रसूतिगृह नाही

पंधरा वर्षांत एकही नवीन प्रसूतिगृह नाही

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:11AMपिंपरी : वर्षा कांबळे 

पिंपरी -चिंचवड शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षात एकही नवीन प्रसुतीगृह वाढवले नाही. त्यामुळे गोरगरीब प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील वायसीएम रुग्णायात 30 टक्के रुग्ण बाहेरुन येत असल्यामुळे इतर रुग्णालयाच्या मानाने सर्वाधिक गर्दी येथे असते. रुग्णालयाच्या प्रसुतीकक्षात दररोज कित्येक महिला या गरोदरपणातील तपासण्या आणि प्रसूतीसाठी येतात. सध्या एकावेळी 30 प्रसूती करण्याची क्षमता असलेल्या प्रसूती विभागात 50 पेक्षा जास्त महिला प्रसूतीसाठी येत असल्याने वायसीएमच्या प्रसूती कक्षावर ताण वाढला आहे. महापालिकेने महिलांच्या सुरक्षित प्रसुतीसाठी आणखी प्रसुतीगृह वाढविण्याची आवश्यकता आहे. 

वायसीएम रुग्णालयात कमी पैशात उपचार मिळतात म्हणून महिलांना त्यांचे घरचे नातेवाईक देखील उपचारासाठी वायसीएममध्येच आणतात. वायसीएममध्ये शहराबाहेरुनही महिला येत असतात, त्यापैकी बहुतांश महिलांची अवस्था प्रसूतीच्या वेळी गंभीर असते. अशावेळी त्यांच्याकडे तातडीने लक्ष देण्यासाठी बेड रिकामा नसेल तर आधीच दाखल असलेल्या महिलेच्या प्रसूतीसाठी वेळ असेल तर तिला दुसर्‍या ठिकाणी बसवून तातडीने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला बेडवर दाखल केले जाते. अशा तातडीक सेवेच्या वेळी दाखल असलेल्या गरोदर महिलांची हेळसांड होते. 

परिणामी एका बेडवर दोन महिलांना अ‍ॅडमिट करण्याची वेळ येत आहे. तसेच जे उपलब्ध डॉक्टर आहेत त्यांच्यावरही कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. या विभागात रुग्णांच्या सोयीसाठी  डॉक्टरांची संख्या वाढविण्याची गरज आहे. रुग्णालयामध्ये आधीच प्रसूती जवळ आलेल्या महिला दाखल असतात. या महिलांना उपलब्ध असलेल्या बेडची संख्या अपुरी असल्यामुळे एकाच बेडवर दोन गरोदर महिलांना नाईलाजास्तव ठेवण्यात येते. कारण तातडीची गरज असलेल्या महिलांना लगेच इतर रुग्णालयात हलविता येत नाही. आणि नातेवाईकही खाली जमिनीवर बेड द्या पण इथेच प्रसूती करा, अशी विनवणी करतात असे येथील कर्मचारी सांगतात. 

 

Tags : pune, pimpri news, maternity home,