Thu, Jul 18, 2019 06:31होमपेज › Pune › एमपीएससी परीक्षेत गैरव्यवहार नाही!

एमपीएससी परीक्षेत गैरव्यवहार नाही!

Published On: Apr 07 2018 1:55AM | Last Updated: Apr 07 2018 1:38AMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) नुकतेच निकाल जाहीर करण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाला नाही. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी घेण्यात येणार्‍या परीक्षेत मुलाखती नसल्याने मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावले जात नाही. त्यामुळे शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची नेमणुक करण्यापूर्वी त्यांनी ऑनलाईन अर्ज करताना केलेल्या सर्वच दाव्यांची तपासणी करण्यात येते. तपासणीवेळी खोटे दावे करणार्‍या उमेदवारांवर कायद्यानुसार कडक कारवाई करत त्यांना आयोगाच्या परीक्षांसाठी अपात्र घोषित करण्यात येते, त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप तथ्यहिन आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिली.

ऑगस्ट 2017 या महिन्यात मुख्य परीक्षा झालेल्या 833 जागांसाठी घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल एमपीएससीद्वारे 31 मार्च 2018 रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा निकाल गेली वर्षभर प्रलंबित असल्यामुळे आयोगाला उमेदवारांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, आता या परिक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप यापूर्वी एमपीएससीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवून करण्यात येणार्‍या गैरव्यवहारावर आवाज उठवणार्‍या योगेश जाधव याने केला. आयोगाने जाहीर केलेल्या निकालांमध्ये माजी सैनिक प्रवर्गाचा लाभ घेऊन पास झालेल्या उमेदवारांमध्ये 23 ते 25 वयाचे उमेदवार आढळून आल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवर संशय उपस्थित करण्यात येऊ लागला. त्यामुळे राज्यभरात याबाबत एमपीएससीच्या विविध परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. त्यावर शुक्रवारी ( 6 मार्च ) आयोगाने आपली भूमिका जाहीर करत परीक्षेत गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा केला.

आयोगाच्या दाव्यानुसार, सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत मुलाखती घेतल्या जात नाहीत. त्यामुळे या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची नेमणूक करण्यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना केलेल्या सर्वच दाव्यांची चौकशी करण्यात येत. यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, अनुभव, आरक्षण, प्रवर्ग, माजी सैनिक प्रवर्ग, वयाचा दावा, अशा सर्वच दाव्यांची तपासणी करण्यात येत. तपासणीनंतरच पात्र उमेदवारांना शासनाच्या विभागात नेमणुका दिल्या जातात. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करताना खोटे दावे करणार्‍या उमेदवारांना नेमणुका दिल्या जात नाहीत. तसेच तपासणी करणार्‍या विभागाद्वारे कळविण्यात आल्यानंतर एमपीएससीद्वारे असे खोटे दावे करणार्‍या उमेदवारांवर कायद्यानुसार कारवाई करत त्यांना सर्वच परीक्षांसाठी अपात्र ठरवत कारवाई करण्यात येते, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष मोरे यांनी दिली. 

आयोगाद्वारे परीक्षेत माजी सैनिक प्रवर्गातून अर्ज करणार्‍या 124 उमेदवारांना शिफारसपत्र देण्यात आले आहे. दरम्यान, या उमेदवारांचे वय कमी असून ते माजी सैनिक आहेत का, यावर शंका उपस्थित करत परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. एमपीएससी परीक्षेत गैरव्यहार झाल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. त्यामुळे आयोगाच्या परीक्षांना बसणार्‍या उमेदवारांनी अशा अपुर्‍या माहितीवर आधारित आणि दिशाभूल करणार्‍या प्रचारास बळी पडू नये, असे आवाहन आयोगाचे अध्यक्ष मोरे यांनी केले.

 

Tags : pune, pune news, MPSC exam, no scam,