Mon, Apr 22, 2019 01:59होमपेज › Pune › रेल्वेची दक्षिणेवर वक्रदृष्टी सुरूच...

रेल्वेची दक्षिणेवर वक्रदृष्टी सुरूच...

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 12 2018 10:57PMपुणे : निमिष गोखले 

रेल्वेची दक्षिण भारतावर वक्रदृष्टी सुरूच असल्याचे चित्र कायम आहे. होळी, रंगपंचमी व उन्हाळी सुटी लक्षात घेता दरवर्षी हॉलिडे स्पेशल रेल्वे (विशेष रेल्वे) सोडण्यात येते. यंदाच्या वर्षीदेखील पुण्यातून काही विशेष रेल्वे सोडण्याची घोषणा झाली; मात्र, या यादीत पुण्याहून थेट दक्षिण भारतात जाणारी एकही हॉलिडे स्पेशल नाही. उलटपक्षी उत्तरेत जाणार्‍या असंख्य गाड्या सोडण्यात येणार असून, यातील अनेक गाड्या रिकाम्या धावतील, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. 

पुण्याहून उत्तर प्रदेशातील मंडुवाडीह येथे दि. 5 एप्रिल ते 14 जूनदरम्यान विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे, तर पुणे ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे दि. 8 एप्रिल ते 17 जूनदरम्यान, पुणे ते बिहार येथील पाटणा येथे दि. 9 एप्रिल ते 30 जुलैदरम्यान, पुणे ते छत्तीसगडमधील बिलासपूर येथे दि. 7 एप्रिल ते 30 जूनदरम्यान, पुणे ते हावडाजवळील सांत्रागाची येथे दि. 9 एप्रिल ते 2 जुलैदरम्यान, पुणे ते झारखंडमधील हटिया येथे दि. 6 एप्रिल ते 29 जूनदरम्यान, पुणे ते उत्तर प्रदेशातील हझरत निजामुद्दीन येथे दि. 22 फेब्रुवारी ते 29 मार्चदरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे यातील एकही रेल्वे दक्षिण भारतात जाणारी नसून, उत्तर भारताला मात्र रेल्वेनेे नेहमीप्रमाणेच भरभरून झुकते माप दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

दरम्यान, मध्य रेल्वेने मुंबईसह ठिकठिकाणहून तब्बल 452 उन्हाळी विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन दि. 29 जानेवारी रोजी जाहीर केले होते. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईहून धावणार्‍या बहुतांश गाड्यादेखील उत्तरेत जाणार्‍याच असल्याचे दिसून आले. मुंबईहून करमाळी (गोवा), सावंतवाडी रोड (महाराष्ट्र), कोचुवेल्ली (केरळ), मंगळुरू (कर्नाटक), चेन्नई सेंट्रल (तमिळनाडू) येथे जाणार्‍या गाड्यांचा अपवाद वगळता दक्षिण भारतात जाणार्‍या विशेष गाड्याच नाहीत, असे स्पष्टपणे दिसून येते.