Wed, Aug 21, 2019 19:03होमपेज › Pune › पुण्यात एकही खड्डा नाही!

पुण्यात एकही खड्डा नाही!

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 30 2018 12:45AMपुणे : प्रतिनिधी

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेचे वाहन आणि कर्मचार्‍यांचे पथक फिरते; पण रस्त्यांवर एकही खड्डा नाही, असा जावईशोध महापालिकेच्या अधिकार्‍यांनी लावला आहे. पुणेकर चकाचक गुळगुळीत रस्त्यांवरून फिरतात की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाची वेगळे वाहन, निरीक्षक आणि कर्मचारी कार्यरत असल्याचा दावाही पालिका अधिकार्‍यांनी केला आहे. या संदर्भात बोलताना पालिकेच्या पथ विभागातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले की,  शहरातील 9 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे पालिकेच्या पथविभागाकडून केली जातात. त्यापेक्षा लहान रुंदीच्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत केली जाते. 

यंदा खड्डे दुरुस्तीसाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडे रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी (आरएमव्ही) वाहन आहे. या सोबत 1 सुपरवायजर आणि 3 कर्मचारी असतात. रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी निरीक्षक करतात, त्यानंतर क्षेत्रीय कार्यालातून वाहन जाऊन खड्डे बुजविले जातात. याकामासाठी शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी 1 कोटी रुपये निधी देण्यात आला असून निधी कमी पडल्यास पुन्हा निधी दिला जाणार आहे. 

नुकसानभरपाई मागितलीच नाही

शहरातील रस्त्यांच्या बाजूला खोदाई करण्यासाठी एमएनजीएल आणि विद्युत वितरण कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. ही कामे महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 255 किलोमीटर पैकी 240 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. आजवर खड्ड्यांमुळे नुकसान झाल्याने नुकसानभरपाई मागणारा एकही अर्ज पालिकेकडे आलेला नाही, असेही संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.

भूमिका

जगाच्या इतिहास - भूगोलावर नाव कोरणार्‍या पुणे महानगरातील पायाभूत सुविधा हा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेला विषय आहे. शहराच्या या आघाडीवरील वाटचालीचा आढावा घेताना फार मागे न जाता, गेल्या दहा - पंधरा वर्षांतील (या काळात विकासाचा वेग वाढला आहे म्हणून) बदलांकडे बारकाईने पाहिले तर काही प्रश्‍न ‘जैसे थे’ आहेत असे दिसते. त्यात शहरातील रस्त्यांचा प्रश्‍नही येतो. येथे चांगल्या रस्त्यांची वानवा आहे. जंगली महाराज रस्ता हा एकमेक नाव घेण्यासारखा होता. अन्य रस्त्यांच्या दर्जाबाबत काय बोलावे? नवे रस्तेदेखील उखडल्याचे पुणेकरांनी पाहिले आहे. खड्डे असलेल्या खराब रस्त्यांमुळे पुणेकरांना पाठदुखीचे त्रास सुरू झाले, याच्या बातम्या विविध माध्यमांतून अनेकदा प्रसिद्ध झाल्या; मात्र त्यातून महानगरपालिका शहाणपण शिकलेली दिसत नाही. उलट ‘खड्डेच नाहीत’, असा दावा छातीठोकपणे करून पुणेकरांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम संबंधित अधिकार्‍यांकडून केले जात आहे. पावसाळा काही दिवसांवर आलाय तरी गांभीर्य नाही. त्यामुळे हा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळायचा आणि झोपलेल्या पालिकेला जागे करायचे, असे ‘पुढारी’ने ठरवले आहे. यासाठी ‘पुढारी’च्या लाखो वाचकांचा रेटाही आवश्यक आहे. या मुद्द्यावर कायदेशीर सल्लादेखील घेतला जाणार आहे आणि त्यातून त्रस्त पुणेकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


जबाबदार कोण? महानगरपालिका की...

रस्ता असमतोल व ओबडधोबड असणे, डांबरीकरण योग्य नसणे अशा अनेक बाबींचा खराब रस्त्यांच्या व्याख्येत समावेश असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले होते. तसेच नागरिकांना चांगले व दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत राज्यातील मुख्य प्रशासकीय व्यवस्था म्हणून राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचीही जबाबदारी असल्याचेही नमूद केले होते. नागरिकांच्या सोयीसाठी चांगले रस्ते तयार करणे नगरपालिका, महापालिकांचे काम असते. रस्त्यांची अवस्था कशी आहे, त्यावरून त्या शहराचा विकास कसा होईल, हे ठरत असते. जेवढे रस्ते चांगले तेवढा त्या शहराचा विकास अधिक, असे समीकरण मांडले जाते. मात्र, अनेक वेळा शहरांमधील रस्त्यांवर विविध कारणांनी खड्डे पडतात. हे खड्डे बुजविण्याची, खड्डे अधिक असल्यास प्रसंगी त्याठिकाणी नवे रस्ते करण्याची जबाबदारी नगरपालिका, महापालिकांची असते. असे असले तरी अनेकवेळा तक्रार करूनही संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दुर्लक्ष केले जाते.

‘पुढारी’कडे पाठवा छायाचित्रे

‘खड्डेच नाहीत’ असे म्हणणार्‍या महानगरपालिकेच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला दिसतील त्या खड्ड्यांची छायाचित्रे ‘पुढारी’ला पाठवा. तसेच तुमच्या फेसबुक पेजवरही ही छायाचित्रे ‘पुढारी’च्या फेसबुक पेजला टॅग करून टाका. यातून मोठी मोहीम उभी राहायला हवी. र्ञ्च्झीपशझेींहेश्रशी हॅशटॅग वापरून तुमच्या फेसबुक पेजसह सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर आपली मते आणि खड्ड्यांची छायाचित्रे जरूर टाका. मात्र ‘पुढारी’ला टॅग करायला विसरू नका. 

संपर्क : mail - pudhari.pune@pudhari.co.in https://www.facebook.com/pudharionline/