Fri, Jul 19, 2019 00:56होमपेज › Pune › पालखी सोहळ्यात भेटवस्तू नाहीच

पालखी सोहळ्यात भेटवस्तू नाहीच

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 12:49AMपिंपरी : प्रतिनिधी  

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना भेटवस्तू दिली जाते. यंदा भेटवस्तू न देता पालखी सोहळ्यात आरोग्य, वैद्यकीय व इतर सोई-सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी बुधवारी (दि. 27) दिली. सत्ताधारी भाजपने बचतीचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे भेटवस्तू न देता पालिकेची आर्थिक बचत करण्याचे सत्ताधार्‍यांची मनस्थिती होती. याबाबत ‘पुढारी’ने ‘दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्याचा निर्णय अद्याप अधांतरी’ हे वृत्त 30 मे रोजी प्रसिद्ध केले होते. हे वृत्त खरे ठरले आहे. 

पालिकेतर्फे जगद्गगुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना भेटवस्तू दिली जाते. गेल्या वर्षी 650 दिंडीप्रमुखांना ताडपत्री भेट देण्यात आली होती. त्यापूर्वी विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती भेट देण्यात आली होती. मात्र, यंदा दिंडीप्रमुखांनी कोणत्याही भेटवस्तूची मागणी केलेली नाही. तसेच, पालिकेने दिलेली भेटवस्तू त्यांना फारशी उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे यंदा पालिकेने भेटवस्तू न देण्याचा निर्णय घेतला आहे, असे पवार यांनी सांगितले. 

संत तुकाराम महाराज पालखीचे 5 जुलैला प्रस्थान आहे. ही पालखी 6 व 7  जुलैला पिंपरी-चिंचवड शहरात आहे. तसेच, संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी 7 जुलैला शहरातून आळंदी मार्गे पुणे येथे जाणार आहे. या दोन्ही पालखींच्या स्वागतासाठी पालिकेने तयारी केली. पालखी सोहळ्यासाठी वैद्यकीय, आरोग्य, मुक्काम, सुरक्षा व इतर सुविधा दिल्या जातात. यंदा त्यामध्ये वाढ केली जाईल, असे पवार यांनी सांगितले. 

मागील दोन वार्‍यांमध्ये मूर्ती व ताडपत्री खरेदीवरून मोठ्या प्रमाणात वाद-विवाद झाले होते. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपाचे रान उठवत भाजपने वातावरणनिर्मिती केली होती. जादा दराने ताडपत्री खरेदी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर केला होता. वाद व आरोप-प्रत्यारोपामुळे भेटवस्तू खरेदी करणार नाही का, या प्रश्‍नांवर पवार म्हणाले की, त्याचा काही संबंध नाही. दिंडीप्रमुखांनी कोणत्याही वस्तूची मागणी केलेली नसल्याने वस्तू खरेदीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. 

स्थायी समितीने प्रशासनाला लघुमुदतीची निविदा प्रक्रिया राबवून महापौर नितीन काळजे यांच्या सूचनेनुसार तंबू खरेदीचा तोंडी सूचना 19 जूनला दिल्या होत्या. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानुसार महोत्सव व जयंतीवर खरेदी करता येत नाहीत, असे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे भेटवस्तू खरेदीसंदर्भात पालिकेचे अधिकारी उदासीन होते. या संदर्भात विचारले असता, पवार म्हणाले की, स्थायी समिती सूचना करू शकते. 

नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन घेऊन भेटवस्तू खरेदीचा करण्याचा सत्ताधारी भाजपचा एक विचारप्रवाह आहे. त्याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, आता नगरसेवकांचे मानधन जमा करून भेटवस्तू खरेदी करण्याची मुदत राहिलेली नाही. पुढील वर्षी या बाबत विचारला केला जाईल. पालिकेच्या वतीने दरवर्षी भेटवस्तू देण्याची परंपरा यंदा खंडित होणार आहे, या संदर्भात विचारले असता पवार म्हणाले की, परंपरा खंडित होत असली तरी, सोहळ्यासाठी अतिरिक्त आणि जास्त सोई-सुविधा देण्याची नवी परंपरा सुरू करीत आहोत. पालिकेच्या वतीने स्वागत मंडप टाकला जाणार नाही. मात्र, तो इतर माध्यमातून टाकला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालखी सोहळ्यात सुविधा वाढवू : महापौर

आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांनी भेटवस्तू देण्याची मागणी केलेली नाही. मात्र, त्यांना नियमानुसार भेटवस्तू देण्याबाबत मध्यवर्ती भांडार विभागास बुधवारी (दि. 20) रितसर पत्र दिले आहे. न्यायालयाचा आदेश व पक्षाच्या निर्णयामुळे भेटवस्तूऐवजी पालखी सोहळ्यात सेवा-सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे, असे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.