Sun, Mar 24, 2019 12:29होमपेज › Pune › एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयाचे फायर ऑडिटच नाही

एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयाचे फायर ऑडिटच नाही

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 05 2018 12:22AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे शहरातील एसटी महामंडळाच्या सेवन लव्हज चौकातील विभागीय नियंत्रक कार्यालयातील फायर सेफ्टी ऑडिट झालेच नसल्याची धकक्‍कादायक माहिती हाती लागली आहे. आरटीओ कार्यालयात नुकतीच आग लागून कागदपत्रांचे नुकसान झाले होते. तरीदेखील एसटी प्रशासनाला अद्यापही जाग आली नसल्याचे दिसते. 

या इमारतीत सुमारे शंभरच्यावर एसटी कर्मचारी सध्या काम करीत असून, या सर्वांच्या जिवाची पर्वा एसटी प्रशासनाला नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, यामुळे येथे कधीही शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणाने आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. फायर ऑडिट दरवर्षी करण्याचा नियम नाही; मात्र तीन वर्षांतून एकदा ते करणे आवश्यक आहे. 
सद्यःस्थितीत त्याचे फायर ऑडिट झालेले नाही. परंतु, ते आम्ही करून घेऊ, अशी माहिती विभागीय अभियंता विजय रेडकर यांनी दिली.

दरम्यान, ऑडिट झाल्यानंतर त्याचा अहवाल बनवावा लागतो. त्यानंतर संपूर्ण इमारतीची फायर सेफ्टी चेक लिस्ट तयार करावी लागते. चेक लिस्टमध्ये इमारतीचे स्ट्रक्‍चरल डिटेल्स, इमारतीतून बाहेर पडण्याचे मार्ग, आदी गोष्टी नमूद कराव्या लागतात. एकूण 55 मुद्दे चेक लिस्टमध्ये असून, सर्वांची नोंद घेतली जाते. त्यानंतर इन्स्पेक्टिंग अ‍ॅथॉरिटीचे नाव, सही, पद लिहावे लागते. सर्व गोष्टींची खातरजमा झाल्यानंतरच फायर सेफ्टी सर्टिफिकेट मिळते, अशी माहिती देण्यात आली.