Wed, Mar 27, 2019 02:05होमपेज › Pune › ‘एमपीएससी’ चा ’आधार’वर भरोसा नाही..

‘एमपीएससी’ चा ’आधार’वर भरोसा नाही..

Published On: Jun 25 2018 1:51AM | Last Updated: Jun 25 2018 12:42AMपुणे ः प्रतिनिधी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे रविवारी (24 जून) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा पूर्व परिक्षेसाठी आधार कार्ड असतानाही दुसरे ओळखपत्र सोबत न आणल्याने शहरातील अहिल्यादेवी मुलींची शाळा या केंद्रावर सहा उमेदवारांना परीक्षा देण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 

एमपीएससीच्या परीक्षांमध्ये बोगस आधार कार्डचा वापर होत असल्याने आयोगाद्वारे उमेदवारांना आधार कार्डासोबत इतर एक ओळखपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती एमपीएससी आयोगाचे प्रभारी अध्यक्ष  चंद्रशेखर ओक यांनी दिली. 

याबाबत बोलताना उमेदवारांनी सांगितले की, हॉल तिकीट, आधारकार्ड असून सुद्धा येथील केंद्रसंचालकांनी परीक्षेला बसू दिले नाही. एकीकडे आधार कार्डची सक्ती करण्यात येत असताना, आधार कार्ड असतानाही परीक्षेला बसू दिले नाही. शहरातील इतर केंद्रावर उमेदवारांकडे फक्त एकच ओळखपत्र असतानाही परीक्षेला बसू दिले जात होते. याठिकाणी मात्र दुसर्‍या ओळखपत्राची सक्ती कशासाठी, असा प्रश्‍न उमेदवारांनी उपस्थित केला आहे.  

परीक्षेला येणार्‍या उमेदवारांकडे दोन ओळखपत्राबाबत सर्व केंद्रांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, काही केंद्रावर या सूचनांचे पालन करण्यात आले नाही. तक्रार प्राप्त झाल्यास आयोगाद्वारे तपासणी करण्यात येईल, असेही ओक यांनी सांगितले. 

सव्वा सहा लाख उमेदवारांची आधार नोंदणी..  

एमपीएससी द्वारे उमेदवारांना आपल्या आयोगाच्या संकेतस्थळावरील खात्यामध्ये आधार कार्ड नंबर नोंदणीबाबत वारंवार आवाहन केले आहे. त्यानुसार सुमारे सव्वा सहा लाख उमेदवारांनी आतापर्यंत आधार नोंदणी केली आहे. अ‍ॅक्टिव्ह प्रोफाईल असलेल्या सुमारे 7 लाख उमेदवारांपैकी सव्वा सहा लाख विद्यार्थ्यांनी आधार नोंदणी केली असून, अद्याप 50 ते 60 हजार उमेदवारांनी आधार नोंदणी केलेली नाही. त्यांना आधार नोंदणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अध्यक्ष चंद्रशेखर ओक यांनी दिली. 

दुसरे ओळखपत्र बंधनकारकच

आयोगांच्या परीक्षांमध्ये डमी उमेदवार बसतात, तसेच परीक्षांमध्ये अनियमितता असल्याचे वारंवार बोलले जाते. त्यामुळे उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय आहे, उमेदवारांना हॉल तिकिट, वेबसाईट आणि मेसेज द्वारे, परीक्षेला येताना दोन मूळ ओळखपत्र सोबत बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.  -चंद्रशेखर ओक, आयोगाचे प्रभारी अध्यक्ष