होमपेज › Pune › दक्षिणेतून येणार्‍या फळांवर नियंत्रण नाही

दक्षिणेतून येणार्‍या फळांवर नियंत्रण नाही

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 27 2018 12:48AMपुणे : प्रतिनिधी

फळ किंवा फळांच्या रसाचे सेवन करून जगणार्‍या फ्रुट बॅट नावाने ओळखल्या जाणार्‍या वटवाघळामुळे दक्षिणेतील केरळ राज्यात निपाह व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे, दक्षिणेतील विविध राज्यांतून शहरातील बाजारपेठेत आवक होणार्‍या फळांबाबत व्यापार्‍यांसह ग्राहकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, येथून मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होणार्‍या अननस, आंबा, शहाळे तसेच केळी आदी फळांवर बाजार समिती प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.  

राज्य सरकारने केरळसह लगतच्या राज्यांमध्ये सतर्कतेचा आदेश दिला आहे. त्यामुळे हा आदेश राज्याला सुध्दा लागू होत आहे. मात्र, अद्यापही या विषाणूंच्या संसर्गाबाबत कृषी विभाग व बाजार समिती प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले नाहीत. सद्य:स्थितीत गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात केरळाहून दररोज 7 गाड्या अननस, कर्नाटकातून 40 हजार पेटी आंबा, शहाळे तसेच तामिळनाडूतून केळींची आवक होते. त्यामुळे, प्रशासनाकडूनही निपाह व्हायरसबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.  

याबाबत बोलताना आडते रोहन उरसळ म्हणाले, राज्यातील मुंबई व पुणे ही देशातील मोठी मार्केट आहेत. येथून, देशातील विविध भागांसह परदेशात मोठ्या प्रमाणात माल पाठविला जातो. त्यामुळे, कृषी विभाग आणि बाजार समितीकडून विषाणू पसरू नये याबाबत काय खबरदारी घ्यावी याची माहिती बाजार घटकांसह ग्राहकांना करून देणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत बाजारात फळांची आवक सुरळीत असून मागणीही कायम आहे. फळांमधूनही या विषाणूंचा प्रसार होत असल्याबाबत अद्याप कोणतीही घटना समोर आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. 

निपाह विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर व्यापार्‍यांशी दक्षता घेण्याबाबत चर्चा झाली आहे. सद्यःस्थितीत केरळमधून अननसाची आवक होत आहे. मात्र, त्यामार्फत संसर्गाची शक्यता कमी असली तरी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. लवकरच, दक्षिणेतील फळांचा व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांसोबत बैठक घेऊन परिपत्रक काढण्यात येणार आहे. दरम्यान, दक्षिणेतील राज्यांमध्ये फळांचे व्यवहार करण्यासाठी जाणार्‍या व्यापार्‍यांनी विषाणूंच्या संपर्कात येणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.  - बी. जे. देशमुख, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.