Thu, Mar 21, 2019 15:36होमपेज › Pune › ‘नीट’ परीक्षा नीट नाहीच

‘नीट’ परीक्षा नीट नाहीच

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 1:43AMपुणे : प्रतिनिधी

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे रविवारी घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षांच्या पुण्यातील केंद्रांवर गोंधळ उडालाच. उशिरा आल्याने तीन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसण्यास मज्जाव करण्यात आला; तर नियमावलीत कुठलाही उल्लेख नसताना कॉलरचे शर्ट घालून आलेल्या विद्यार्थ्यांच्या कॉलरच परीक्षा केंद्रावर कापण्याचा तुघलकी निर्णय पर्यवेक्षकांनी राबविल्याची घटना पिंपळे सौदागर येथील एका परीक्षा केंद्रावर घडला. त्यामुळे ‘नीट’ परीक्षा पुण्यात काही नीट झाली नाही, असेच म्हणण्याची पाळी विद्यार्थी आणि पालकांवर आली.

राज्यासह देशभरात ‘नीट’ची परीक्षा रविवारी पार पडली. या परीक्षेसाठी बोर्डाच्या वतीने ड्रेसकोड आधीच जाहीर करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना त्याची माहितीही देण्यात आली होती. या सूचनांचा फलकही परीक्षा केंद्राच्या बाहेर लावण्यात आला होता. त्यात हाफ बाह्यांचे शर्ट घालून येण्यापासून, ते सोबत पेन न आणण्याच्या सूचनाही विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या; मात्र, त्यात बिन कॉलरचा शर्ट असू नये, असा उल्लेख कुठेही करण्यात आला नव्हता; मात्र पुण्यातील पिंपळे सौदागर येथे काही विद्यार्थी कॉलर असलेले शर्ट घालून आले असता, त्यांना परीक्षा केंद्रावरच अडवण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या शर्टाची कॉलर कापल्यानंतरच त्यांना परीक्षेला बसू देण्यात आले असल्याची माहिती परीक्षार्थी व विद्यार्थ्यांनी दिली. 

केवळ हाफ बाह्याचा शर्ट आणि दागदागिन्यांसंदर्भात उल्लेख असताना कॉलरचा मुद्दा कुणी आणि कशासाठी पुढे आणला, त्यातही काही गरीब विद्यार्थ्यांनी आपल्याकडे दोनच शर्ट आणि तेही कॉलरचे असल्याने ते घातल्याशिवाय आपल्याला पर्याय नव्हता, मग असा मनमानी निर्णय कसा काय राबविण्यात आला; अशा संतप्त प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिल्या. एवढेच नाही तर नीट परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पिण्यासाठी पाणी मिळाले नाही, तसेच पालकांना देखील बसायला पुरेशी जागा उपलब्ध नव्हती, अशा तक्रारीही काही पालकांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे केल्या.

देशभरातून अंदाजे एकूण 13 लाख 26 हजार 961 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.तर राज्यातील सुमारे 1 लाख 83 हजार 961 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. देशभरातील एकूण 2 हजार 255 तर राज्यातील 345 केंद्रावर ‘नीट’ परीक्षा झाली. 5 जून 2018 रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

पोशाखासाठी नियमावली

विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र, पासपोर्ट आकारातील छायाचित्र याशिवाय कोणत्याही वस्तू परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास मनाई होती. सकाळी दहा वाजता सुरू होणार्‍या परीक्षेसाठी सकाळी साडेसात ते साडेआठ आणि साडेआठ ते साडेनऊ अशा दोन टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. कोणत्याही प्रकारचे कागद, लेखन साहित्य, पाकीट, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पट्टा, सॅक, गॉगल्स, अंगठी, माळ यांसह सर्व प्रकारचे दागिने, घड्याळ, ब्रेसलेट, पाण्याची बाटली, खाण्याचे पदार्थ, कोणत्याही धातूच्या वस्तू परीक्षा केंद्रात नेता येणार नाही, असे अगोदरच बोर्डाने जाहीर केले होते. 

दै. ‘पुढारी’शी संपर्क साधा

‘नीट’ परीक्षा देताना विद्यार्थ्यांना ज्या तुघलकी कारभाराचा फटका बसला, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दै. ‘पुढारी’ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी मांडण्यासाठी 9665098666 या क्रमांकावर संपर्क साधावा.

पेनही परीक्षा केंद्रावरच

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पेनही परीक्षा केंद्रावरच दिला जाणार होता. देशभरातील परंपरेनुसार घालण्यात येणार्‍या पगडी, टोपी किंवा इतर कपडे घालणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक तास लवकर येण्याची सूचनाही करण्यात आली होती.