Fri, Apr 26, 2019 17:22होमपेज › Pune › पकडलेल्या सापांना ठेवण्याची व्यवस्थाच नाही

पकडलेल्या सापांना ठेवण्याची व्यवस्थाच नाही

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 03 2017 11:58PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रदीप लोखंडे

पूर्वी सर्पमित्रांकडून पकडलेले साप महापालिकेच्या चिंचवड येथील बहिणाबाई उद्यानात ठेवले जायचे. सध्या या ठिकाणी सर्प ठेवण्याला बंदी घातली आहे. महिन्याकाठी शहरात पाचशे साप सापडत आहेत. त्यामुळे हे साप ठेवायचे कुठे, असा सवाल शहरातील सर्पमित्र उपस्थित करत आहेत, तर सर्पमित्रांना देण्यात येणारे मानधनही बंद झाल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

प्राण्यांविषयी असणारी आवड म्हणून अनेक तरुण सर्पमित्र बनण्याला प्राधान्य देत आहेत. विविध संस्था व अनुभवी सर्पमित्र यांच्या सोबत जाऊन ते साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतात. शहरात निघणार्‍या सापांना पकडण्यासाठी महापालिकेकडून अशा सर्पमित्रांना मानधनावर घेतले जाते. साप हाताळण्याचे कौशल्य पाहून महापालिकेकडून त्यांना महापालिकेचे सर्पमित्र कर्मचारी असल्याचे ओळखपत्र दिले जाते. महिन्याकाठी त्यांना 11 हजार, 500 रुपये मानधन दिले जाते. महापालिकेअंतर्गत शहरात एकूण आठ सर्पमित्र सध्या कार्यरत आहेत. त्यांची सहा महिन्याच्या कालावधीसाठी मानधनावर नियुक्ती केली जाते. 

सारथीवर येणार्‍या तक्रारींवरून व नागरिकांसाठी उपलब्ध असणार्‍या संपर्क क्रमांकांवरून त्यांना साप पकडण्यासाठी नागरिक बोलावतात. दिवसाला एका सर्पमित्राला साप पकडण्यासाठी सुमारे तीन कॉल येतात. एका सर्पमित्राकडून दिवसाकाठी तीन साप पकडले जात आहेत. महिन्याकाठी शहरातून सुमारे पाचशे साप सर्पमित्र पकडत आहेत. नागरिकांकडून तक्रार आल्यानंतर संबंधित ठिकाणी जाऊन साप पकडले जातात. पकडलेले हे साप पूर्वी महापालिकेच्या बहिणाबाई प्राणी संग्रहालयाकडे सुपूर्त केले जायचे. सध्या वन विभागाच्या सूचनेवरून व आरोप होत असल्यामुळे सर्पमित्रांकडून येणारे साप न घेण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे.

त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात निघणारे साप कोणाकडे द्यायचे, असा सवाल शहरातील सर्पमित्र विचारत आहेत. त्यामुळे पकडलेले हे साप जंगलामध्ये सोडण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. या शिवाय या सर्पमित्रांच्या रोजगाराचाही प्रश्‍न निर्माण झाला असून, त्यांना महापालिकेकडून मिळणारे मानधनही बंद झाले आहे. त्यामुळे पकडलेले साप सोडायचे कुठे, याबाबत महापालिकेची ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ अशी अवस्था झाली आहे.याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. 

मग, साप कोण पकडणार?

शहरात साप निघाल्यास ते पकडण्यासाठी सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. सारथीवरूनही त्यांना साप पकडण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. नागरिकांच्या आलेल्या तक्रारींवरून सर्पमित्रांकडून साप पकडले जात आहेत; मात्र सध्या महापालिकेकडून मानधन दिले जात नाही. संबंधित अधिकारीही कॉल आला तर नका साप पकडू, अशी उद्धट उत्तरे देत आहेत; मात्र कॉल येऊनही आम्ही साप पकडले नाहीत तर कोण पकडणार, असा सवाल सर्पमित्र उपस्थित करत आहेत.