Fri, Jul 19, 2019 20:04होमपेज › Pune › ६२ बनावट कृषी विद्यालयांना अभय 

६२ बनावट कृषी विद्यालयांना अभय 

Published On: Jun 19 2018 1:26AM | Last Updated: Jun 19 2018 1:06AMपुणे : शंकर कवडे / गणेश खळदकर 

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांकडून कार्यक्षेत्रातील 62 बनावट कृषी विद्यालयांवर कारवाईऐवजी त्यांना अभय दिले जात आहे. विद्यापीठाच्या उदासीनतेमुळे सोलापुरात चक्क राष्ट्रीय मागासवर्ग खुले माहिती व तंत्रज्ञान नावाने बनावट विद्यापीठच अस्तित्त्वात आले आहे. या बनावट विद्यापीठाकडून राज्यात बनावट कृषी महाविद्यालये चालविली जात आहेत. 

दैनिक ‘पुढारी’ने यावर्षी एप्रिलमध्ये हा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर संबंधित कृषी विद्यालयांबाबत अहवाल सादर करून, गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश महाराष्ट्र कृषी परिषदेने संबंधित विद्यापीठांना दिले होते. 

त्यानंतर डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ठाणे जिल्ह्यात 1, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात 3, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात 8, बीड 7, लातूर 7 आणि औरंगाबाद येथे 1 कृषी विद्यालय अनधिकृतरित्या सुरू असल्याचे उघड झाले होते. याखेरीज सोलापूर जिल्ह्यात 23, नगरमध्ये 4, पुणे, कोल्हापूर, सांगली येथे प्रत्येकी 2 आणि जळगाव व धुळे जिल्ह्यात प्रत्येकी 1 असे एकूण 62 बनावट कृषी विद्यालये  राष्ट्रीय मागासवर्ग नावाने चालविण्यात येत असल्याचेही समोर आले होते. 

सर्वाधिक बोगस विद्यालये असलेल्या राहुरी व परभणी विद्यापीठाने अद्याप अहवालच सादर केला नाही. त्यामुळे बोगस पदव्यांची खैरात करणार्या या विद्यालयांना अंकुश कोण घालणार, हा प्रश्‍नच आहे. 

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना बोगस कृषी विद्यालये तसेच विद्यापीठांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यास सांगितले आहे. सद्यःस्थितीत दापोली व अकोला कृषी विद्यापीठांचे अहवाल महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला प्राप्त झाले आहेत. मात्र अद्याप कोणत्याही विद्यालयावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे विद्यापीठांकडून परिषदेला कळविण्यात आले नाही. - डॉ. हरिहर कौसडीकर, शिक्षण संचालक, महाराष्ट्र कृषी परिषद