Thu, Nov 15, 2018 22:31होमपेज › Pune › महिलादिनी पालिकेस जिजाऊंचा विसर

महिलादिनी पालिकेस जिजाऊंचा विसर

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 12:14AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेस जिजाऊ मासाहेबांचा विसर पडला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त पालिकेने छापलेल्या निमंत्रणपत्रिकेवर विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांचा फोटो आहे; परंतु त्यात जिजाऊंचा मात्र फोटो नाही.

नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने महिला दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात गुरुवारी (दि. 8) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता या कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे. 

या वेळी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल आदी उपस्थित राहणार आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार, 10 वर्षे पूर्ण झालेल्या महिला बचत गटांचा सत्कार, मराठमोळ्या लावण्यांचा कार्यक्रम, खेळ रंगला पैठणीचा, ‘कुटुंब जोडण्यामध्ये स्त्रीची भूमिका’ या विषयावर स्मिता जोशी यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमांच्या निमंत्रणपत्रिकेवर विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांचा फोटो छापण्यात आला आहे; मात्र त्यात जिजाऊंचा फोटो नसल्याने संताप व्यक्त होत आहे.