Tue, Mar 26, 2019 23:56होमपेज › Pune › ‘हॉटेल वेस्ट’पासून बायोगॅस प्रकल्प हवेतच

‘हॉटेल वेस्ट’पासून बायोगॅस प्रकल्प हवेतच

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 01 2018 10:52PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील  हॉटेल्सकडून जमा होणारे  शिल्लक अन्न आणि खरकटे (हॉटेल वेस्ट) यांपासून बायोगॅस प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावर सुरू करण्यास स्थायी समितीने 26 जुलै 2017 ला मंजुरी दिली होती. मात्र, संबंधित ठेकेदार कंपनीकडून बँक ठेव (गॅरंटी) जमा केली जात नसल्याने हा प्रकल्प एका वर्षांपासून रखडला आहे. 

शहरातील शेकडो हॉटेल्सपासून तयार होणार्‍या ‘हॉटेल वेस्ट’पासून बायोगॅस तयार करण्याचा प्रकल्प पालिकेच्या वतीने ‘पीपीपी’तत्वावर सुरू करण्याचे नियोजन आहे.  शहरातील हॉटेल्स, खाद्यपदार्थ स्टॉल व टपर्‍यामधून दररोज 50 मेट्रिक टन ‘हॉटेल वेस्ट’ जमा करून मोशी कचरा डेपोत वाहून नेणे. तेथे या कचर्‍यातील प्लास्टिक, स्टिल व भंगार बाजूला काढून त्याची पेस्ट तयार करणे. ती पेस्ट बंद टँकरद्वारे तळेगाव दाभाडे एमआयडीसी

येथील प्रकल्पात वाहून नेणे. तेथे बायोगॅस तयार करण्याच्या कामास नोबल एक्सचेंज एन्व्हायरमेंट सोल्युशन प्रा. लि. कंपनीस मंजुरी दिली आहे. त्यास स्थायी समितीने 26 जुलै 2017 ला मान्यता दिली. हे काम 20 वर्षांच्या कराराने देण्यात आले होते. या कंपनीस ‘हॉटेल वेस्ट’च्या प्रत्येक टनासाठी 1 हजार 125 रूपये वाहतूक शुल्क पालिका अदा करणार आहे. या दरात प्रत्येक वर्षी 5 टक्के वाढ करण्यात येणार आहे. तर, निर्माण होणारा बायोगॅस कंपनी विकून उत्पन्न मिळविणार आहे.  या कामासंदर्भात कंपनीसोबत 1  मार्च 2018 ला करारनामा करण्यात आला. सदर ठेकेदार कंपनीने वर्कऑर्डर देण्यापूर्वी 50 लाख रूपयांची बँक ठेव  पालिकेकडे जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, कंपनीस वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. कंपनी मुदतवाढ देण्याची मागणी करीत वेळकाढूपणा करीत आहे. त्यामुळे तब्बल एका वर्षांपासून हा बायोगॅस प्रकल्प रखडला आहे. 

तसेच, कचर्‍यापासून वीज निर्मिती (वेस्ट टू एनर्जी) या प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या  कामास स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने फेबु्रवारी 2018ला मंजुरी दिली आहे.या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे निश्‍चित झाले होते. मात्र, तांत्रिक कारणामुळे ते रद्द करण्यात आले. अद्याप ठेकेदार कंपनीस सदर प्रकल्पासाठीबँकेकडून कर्ज मंजूर झालेले नाही. प्रकल्प उभारण्याचा कालावधी 18 महिन्यांचा आहे. 

‘पीपीपी’मुळे पालिकेची कोट्यवधीची बचत

बायोगॅस प्रकल्प ‘पीपीपी’तत्त्वावर पिंपरी-चिंचवड महापालिका सुरू करीत आहे. शहरातील ‘हॉटेल वेस्ट’ जमा करून तो मोशी कचरा डेपो येथून तळेगाव दाभाडे येथे वाहून नेण्याचे काम संंबंधित कंपनीस करायचे आहे. त्यामुळे पालिकेचा प्रकल्प उभारणीचा तसेच देखरेख, दुरुस्तीचा कोट्यवधीचा खर्च वाचत आहे. तसेच, शहरातील ‘हॉटेल वेस्ट’ची विल्हेवाट लागणार आहे. मात्र, संबंधित कंपनीने बँक ठेव अद्याप पालिकेकडे जमा न केल्याने त्यास अंतिम मंजुरी दिली गेली नाही. कंपनीसोबत पालिका पत्रव्यवहार करीत असल्याचे  पालिकेचे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.