होमपेज › Pune › विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजनाची नियमावलीच नाही

विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजनाची नियमावलीच नाही

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 1:13AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध प्रभागात विकास कामे होत असतात. मात्र, या कार्यक्रमांचे उद्घाटन व भूमिपूजन  करण्यासाठी कोणतीही नियमावली नाही. महापौरांच्या पत्रान्वये पुढील कार्यवाही केली जाते, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. 128 पैकी 77 जिंकून भाजपने सत्ता संपादन केली. राष्ट्रवादीच्या कार्यकाळात विरोधकांना सन्मानाची वागणूक दिली जात होती. गटनेत्यांची नावे जाहिराती, निमंत्रण पत्रिका, कोनशिलेत असत मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी यास फाटा दिला. विशेष अतिथी म्हणून आ. लक्ष्मण जगताप व आ. महेश लांडगे या दोन्ही आमदारांची नावे वर टाकली जावू लागली. विरोधी पक्षातील गटनेत्यांची नावे वगळली जावू लागली. गेल्या वर्ष सव्वा वर्षापासून हाच खेळ सुरू आहे. 

वाकड, पुनावळे प्रभागात शिवसेनेचे राहुल कलाटे, अश्‍विनी वाघमारे, रेखा दर्शिले व राष्ट्रवादीचे मयूर कलाटे हे नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेचे गटनेते असलेल्या राहुल कलाटे यांनी भाजपला शह देण्यासाठी मे महिन्यात महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते प्रभागातील विकासकामांची उद्घाटने करून घेतली. या कार्यक्रमाबाबत अंधारात ठेवल्याने भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, पक्षनेते  एकनाथ पवार यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेतले.

तसेच या कार्यक्रमास उपस्थित अधिकार्‍यांची चौकशी करावी, निमंत्रण पाठविण्यास उशिर का झाला अशी विचारणा करत या अधिकार्‍यांवर कारवाईची महापालिका स्थायी समितीने शिफारस केली. यामुळे अधिकारी चांगलेच धास्तावले त्याबरोबरच विरोध पक्षाच्या नगरसेवकांमध्येही याबाबत चीड निर्माण झाली. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी महापालिकेच्या उदघाटन व भूमीपूजन कार्यक्रमांसाठी काही नियमावली आहे, काय अशी विचारणा प्रशासनाकडे केली होती. त्यावर प्रशासनाने अशा प्रकारची नियमावली नाही. महापौरांच्या पत्रान्वये कार्यवाही केली जाते, असे उत्तर दिले आहे.

महापालिकेच्या इतिहासात आजवर अशी नियमावली नाही, महापौरांच्या सूचनेनुसार कार्यक्रमाची आखणी, रूपरेषा ठरवून अंमलबजावणी केली जाते. ही पारंपारिक पद्धत असल्याचे प्रशासनामुळे स्पष्ट झाले आहे. मात्र या पद्धतीत भाजपने बदल केला आहे. त्यांनी विचार विनिमय न करता कार्यक्रमांमध्ये गटनेत्यांची नावे वगळण्याचे सुरू केल्याने या प्रकारास सेनेचगटनेते राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला आहे.