Mon, Mar 25, 2019 02:49
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › दहावीच्या कला, क्रीडा विषयांच्या गुणांना कात्री

दहावीच्या कला, क्रीडा विषयांच्या गुणांना कात्री

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेत क्रिडा क्षेत्रासोबतच कला, चित्रकला, लोककला क्षेत्रात प्राविण्य मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याच्या पद्धतीत राज्य मंडळाने बदल केला आहे. आता विद्यार्थ्यांना कलेतील प्राविण्यासाठी 25 ऐवजी फक्त 15 गुणच मिळणार आहेत. त्यामुळे शाळांद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या सवलतीचे अतिरिक्त गुणांना कात्री बसणार असून अतिरिक्त गुणांमुळे वाढणारा निकाल आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे. 

शास्त्रीय नृत्य, गायन व वादन यामध्ये नृत्य किंवा संगीताच्या शासनमान्य संस्थेने घेतलेल्या परीक्षेत किती गुण मिळाले किंवा श्रेणी मिळाली त्यावर अतिरिक्त गुण अवलंबून असणार आहेत. किमान तीन ते कमाल 15 गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना आता 65 टक्क्यांपेक्षा जास्त गुण व ए तसेच ए प्लस ग्रेड असल्यास व 3 री परिक्षा दिलेली असल्यास 10 गुण व 5 वी परिक्षा दिलेली असल्यास 15 गुण मिळणार आहेत. बी प्लस ग्रेडसाठी 3 री परिक्षा 7 गुण व 5 वी परिक्षा 10 गुण असे गुण मिळणार आहेत. बी ग्रेडसाठी 5 गुण तर सी ग्रेडसाठी 3 गुण मिळणार आहेत. 

राज्य किंवा राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना 25 गुण देण्यात येत होते. ते आता मिळणार नाहीत. इयत्ता 7 वी ते 10 वी या शैक्षणिक वर्षात लोककला प्रकारातील सादरीकरणासही यापुढे गुण मिळणार आहेत. 25 ते 50 प्रयोग केल्यास 5 गुण तर 50 पेक्षा जास्त प्रयोग असल्यास 10 अतिरिक्त गुण मिळणार आहेत. बालनाट्य स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणार्‍यास 15 गुण, रौप्यपदक 10 गुण तर कांस्य पदक मिळविणार्‍यांना 5 गुण देण्यात येतील. चित्रकलेसाठी इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेतील ए ग्रेड मिळविणार्‍या विदयार्थ्यांना 7 गुण, बी ग्रेड मिळविणार्‍यास 5 गुण तर सी ग्रेड मिळविणार्‍या विदयार्थ्यांना 3 गुण देण्यात येणार आहेत. 

अकरावी प्रवेशासाठी  राखीव जागांचा कोटा रद्द 

कलाकार विद्यार्थ्यांसाठी अकरावीला प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आलेला 2 टक्के राखीव जागांचा कोटा रद्द करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आतिरिक्त गुण आणि राखीव जागा अशा दोन्ही सवलती देणे योग्य नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. त्यामुळे यापुढे अकरावीच्या प्रवेशासाठी कलेतील प्राविण्याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकणार नाही.