Sun, Jun 16, 2019 02:11होमपेज › Pune › तब्बल ८५ अनधिकृत शाळांवर कारवाई नाही

तब्बल ८५ अनधिकृत शाळांवर कारवाई नाही

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 10:42PMपुणे : लक्ष्मण खोत 

एकीकडे शिक्षण विभागाद्वारे दरवर्षी पालकांना अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका, असे आवाहन करण्यात येते, तर दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र शिक्षण विभागाद्वारे अनधिकृत शाळांवर कारवाईच केली जात नाही. गेल्यावर्षी शिक्षण विभागाद्वारे राज्यातील तब्बल 583 शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले होते. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा मिळून तब्बल 85 शाळा अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली. संबंधित शाळांवर शिक्षण विभागाद्वारे कारवाई करणे अपेक्षित असताना गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील एकाही अनधिकृत शाळेवर कारवाई करण्यात आलेली नाही. 

राज्यात शाळांना शिक्षण खात्याची मान्यता नसताना अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्याचे दाखवून शाळांकडून प्रवेशासंबंधी जाहिराती प्रसिध्द केल्या जातात. त्यामुळे अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्याने पालकांसह विद्यार्थ्यांची मोठी शैक्षणिक फसवणूक होत असते. त्यामुळे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षणाधिकार्‍यांद्वारे अनधिकृत शाळांची नावे 31 मेपर्यंत जाहीर केली जातात. त्यानुसार गतवर्षी शिक्षण विभागाद्वारे राज्यात तब्बल 583 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर कऱण्यात आले होते. यामध्ये पुणे महापालिका हद्दीत तब्बल 29 शाळा, तर पिंपरी-चिंचवड शहरात 16, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तब्बल 40 शाळा अशा मिळून जिल्ह्यात तब्बल 85 शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर करण्यात आले. शिक्षण हक्क कायद्यानुसार अनधिकृत शाळा शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर सुरू राहिल्यास संबंधित शाळेस एक लाखाचा दंड आणि शाळा सुरू झाल्यापासून दरदिवशी शाळेवर दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार होता. प्रत्यक्षात मात्र गेल्या वर्षभरात जिल्हातील एकाही अनधिकृत शाळेवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही.  

पुणे महापालिका हद्दीत सुरु असलेल्या 29 अनधिकृत शाळांपेकी आतापर्यंत एकाही शाळेवर कारवाई करण्यात आलेली नाही. संबंधित शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात महापालिकेच्या 13 क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक प्रशासकिय अधिकार्‍यांकडून माहिती मागविण्यात आली असल्याची उडवाउडवीची उत्तरे शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून दिली जात आहेत. हीच स्थिती पिंपरी - चिंचवड महापालिका हद्दीतील 16 अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मिळून असलेल्या 40 अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात विभागाकडे विचारलेल्या माहितीवर तालुक्यातील गटशिक्षण अधिकार्‍यांना या संदर्भात माहिती मागविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी दिली. प्रत्यक्षात अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत असून जबाबदारी झटकण्याचे प्रकार शिक्षणाधिकार्‍यांद्वारे सुरू आहेत. 

आतापर्यंत शाळा बंद कऱण्यासंदर्भातील पत्र व्यवहार वगळता शाळांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळांही शिक्षण विभागाच्या आदेशाला धाब्यावर सवत सर्रास विद्यार्थ्यांना प्रवेश देत पालकांची आर्थिक लूट करत आहेत. राज्यातील किती अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली. याबाबत राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनायलाचे उपसंचालक शरद गोसावी म्हणाले, गेल्या वर्षभरात अनधिकृत शाळांवर केलेल्या कारवाईबाबत अद्याप कार्यालयाला माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे एकूणच राज्याचा शिक्षण विभागच अनधिकृत शाळांवर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे.

 

Tags : pune, pune news, unauthorized school, action,