होमपेज › Pune › ‘पीएमपी’ चालक सुटणार आता मोकाट 

‘पीएमपी’ चालक सुटणार आता मोकाट 

Published On: Mar 21 2018 2:10AM | Last Updated: Mar 21 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी 

‘पीएमपी’चा  चालक बस चालवित असताना त्याचे मोबाईलवर बोलत असल्याचे छायाचित्र काढून  ‘पीएमपी’ प्रशासनाकडे दिल्यानंतर चालकास एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत होता. ही  रक्कम संबंधित छायाचित्र काढणार्‍या नागरिकांस  बक्षीस स्वरूपात देण्यात येत होती. आता  मात्र ही रक्कम छायाचित्र काढणार्‍यास न देता पीएमपी कामगार कल्याण निधीत वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. 

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष सुब्बाराव यांनी सन  2008 मध्ये  परिवर्तन नावाने प्रवासी  चळवळ सुरू केली होती. त्यामध्ये बस  झेब्रा क्रॉसिंगवर  उभी असणे, बसला मार्ग फलक नसणे, बसमधून गळती होणे याची माहिती दिल्यास त्यासाठी  100 रुपये दंड ठेवण्यात आला होता. तसेच  बस चालवताना चालक मोबाईलवर बोलत असेल तर त्यास एक हजार रुपये दंड ठोठावण्याची योजना सुरू करण्यात आली होती.  हा दंड संबंधित छायाचित्र काढणार्‍या    नागरिकास  बक्षीस स्वरूपात देण्यात येत होता. आता मात्र सध्याचे पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या आदेशानुसार ही रक्कम पीएमपी कामगार कल्याण निधीत वर्ग होईल.

याबाबत प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी म्हणाले, “पीएमपी प्रशासनाने घेतलेला निर्णय हा  अत्यंत चुकीचा आहे.  चालकाने दक्षता घ्यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय बदलण्यात आल्यामुळे पुढील काळात  चालक प्रवाशांचा कोणताही विचार न करता  बिनधास्तपणे मोबाईलवर बोलत बस चालवतील. त्यांना कोणाचाही धाक राहणार नाही.  

Tags : pune, pune news,  workers, ordered,  participate, welfare, fund.