होमपेज › Pune › कार्यकर्ता निष्काम कर्मयोगाने घडतो : अण्णा हजारे

कार्यकर्ता निष्काम कर्मयोगाने घडतो : अण्णा हजारे

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 10:57PMपिंपरी : प्रतिनिधी

कार्यकर्त्याने राजकीय पदाकडे आकर्षित न होता निष्काम कर्मयोगाने काम केले पाहिजे असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. पुण्यातील आशिया मानवशक्ती विकास संस्था, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, भोसरीतील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या वतीने राळेगणसिद्धी येथे आयोजित केलेल्या सामाजिक कार्यकर्ता शिबिरात हजारे बोलत होते. यावेळी पुण्याचे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन तज्ज्ञ राज मुछाल, संयोजक समितीचे  पुरुषोत्तम सदाफुले, नारायण सुर्वे अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, मुख्य समन्वयक मुरलीधर साठे, अनिल कातळे उपस्थित होते.

अण्णा हजारे म्हणाले, कार्यकर्ता हा ध्येयवादी, प्रत्येक प्रश्नाच्या तळाशी जाऊन अभ्यास करणारा, निष्कलंक, त्याग करण्याची वृत्ती असलेला असला पाहिजे.  त्याच्या शब्दाला कृतीची जोड मिळाली पाहिजे. त्याशिवाय त्याच्या शब्दाला वजन प्राप्त प्राप्त होत नाही. मी आणि माझे असा विचार न करता माझा शेजारी, माझा गाव, माझा देश या गोष्टीला प्राधान्य देऊन कार्यकर्त्याने काम केले पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री होणे हे राजकीय कार्यकर्त्याचे ध्येय नसावे. कार्यकर्त्याने राजकीय पदाकडे आकर्षित न होता निष्काम कर्मयोगाने काम केले पाहिजे. महात्मा गांधीजी यांना अभिप्रेत असलेला देश घडवायचा असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याने खेड्यात जाऊन काम केले पाहिजे, खेड्याचा विकास करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. सुख हवे असेल तर दुसर्‍याला सुख दिले पाहिजे. परंतु आजकालचा युवक हा मी आणि माझे या पलीकडे विचार करताना दिसत नाही मग देश कसा बदलणार? असा प्रश्न त्यांनी  केला. 

राज मुछाल म्हणाले,  जगामध्ये विपुलता आहे. प्रत्येकासाठी निसर्गाने काहीतरी निर्माण केले आहे. वेळ येईल तेंव्हा ते प्रत्येक मिळणार आहे. त्यासाठी ईर्षा, स्पर्धा करण्याची गरज नाही चंद्रकांत दळवी म्हणाले, ज्या खेडेगावात सजग, तळागाळात जाऊन कार्य करणारे कार्यकर्ते आहेत, त्या गावाचा विकास लवकर होतो. गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने एकत्र आले पाहिजे. शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे. शहरी भागातील नोकरवर्गाने खेड्यात येऊन काम केले पाहिजे.  शहरातील माणूस खेड्यात आला तर देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही.प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले, स्वागत सुदाम भोरे यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले राजेंद्र वाघ आणि रोहित खर्गे यांनी आभार मानले.