Sun, Mar 24, 2019 23:45
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › गोमातांच्या वेदनांवर ‘केंद्राई’ची फुंकर

गोमातांच्या वेदनांवर ‘केंद्राई’ची फुंकर

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 12:58AMपिंपरी ः पूनम पाटील

माणसांच्या वेदना सर्वांना कळतात ; मात्र मुक्या जनावरांना सांगता येत नाही.  त्यामुळे अशा अपघातग्रस्त, आजारी तसेच ज्यांना परिस्थितीअभावी गायींचे पालन करणे शक्य नाही, अशा भटक्या व निराश्रीत गायींचे पालन करण्याचे काम चिंचवडमधील केंद्राई गोशाळेमार्फत मागील तीन वर्षांपासून केले जात आहे. मंगलमूर्ती ग्रुपमार्फत केंद्राई गोशाळेचे कामकाज चालत असून चिंचवडमधील सुदर्शन नगर येथे ही गोशाळा वसली आहे. 

मंगलमूर्ती ग्रुपमध्ये विविध व्यवसाय करणारी युवा मंडळी असून देशी गायींचे महत्व जाणून या सर्वांनी मिळून केंद्राई गोशाळा चालवण्याचे ठरवले. त्यानुसार जेव्हापासून गोरक्षणाचा कायदा अस्तित्वात आला तेव्हापासून शेतकर्‍यांना गायींचे पालन करणे कठिण जाऊ लागले. तसेच बिगर दुध देणार्‍या गायींना विनाकारण कसे पोसायचे अशी अडचण शेतकर्‍यांपुढे निर्माण झाली होती. गायींना विकणे हा गुन्हा असल्याने अशा गायींना बेवारस सोडण्यात येऊ लागले. अशा भटक्या व आजारी गायींचा साभाळ केंद्राई मध्ये करण्यात येतो. 

गायींचा वापर केवळ दूध देण्यापूरताच न करता गोमुत्र व शेणापासून अनेकविध उपयोग होतात. त्यानुसार गोमुत्र व शेणापासून वस्तू निर्मिती करुन त्याची विक्री करायची व स्वेच्छेने जे मिळेल त्या किंमतीत हे उत्पादन विकायचे व त्यातून मिळणार्‍या पैशातूनच गायींची देखभाल करण्याचे काम गोशाळेमार्फत केले जाते. नागरिकांच्या सहकार्याने गोशाळेचे काम सुरु असून अनेकजण याठिकाणी गायी सोडून जातात. त्यामुळे दिवसेंदिवस जबाबदारी वाढली आहे. 

प्राण्यांसाठी शहरात हवी अ‍ॅम्ब्युुलन्स

इतर राज्यात गायींसाठी तसेच वेगवेगळ्या आजारी प्राण्यांसाठी अ‍ॅनिमल अ‍ॅम्बुलन्स आहेत. आपल्या राज्यात मात्र, तशी सोय नसल्याची खंत धनंजय गावडे यांनी व्यक्त केली. आजारी गायींना बरे करून त्यांच्यापासून मिळणार्‍या उत्पादनाचा ते त्यांच्याच देखभालीसाठी वापर करत आहेत. सुरुवातीला गोशाळेच्या कल्पनेला कुटुंबीयांचा व परिसरातील नागरिकांचा विरोध झाला. परंतु, धनंजय गावडे यांची स्वतःची जागा त्यांनी गोशाळेसाठी वापरून आपण काहीही चुकीचे करत नसल्याचे सिध्द केलेे. त्यामुळे ग्रुपमधील सर्वांच्या कुटुंबीयांनी या गोशाळेला पाठिंबा देत आज तेही गायींचा सांभाळ करण्यास मदत करत आहेत. केंद्राई गोशाळेत बर्‍या झालेल्या गायींना आजवर अनेक दानशूर व्यक्ती सांभाळ करण्यासाठी घेऊन जात आहेत. दर महिन्याला जवळपास 22 ते 23 गायी मोफत दिल्या जातात, अशी माहिती धनंजय गावडे यांनी दिली.

गायींना सांभाळण्यासाठी महिन्याकाठी पन्नास ते साठ हजार खर्च होतो. परंतु, त्यांच्या गोमूत्र किंवा शेणापासून तयार होणार्‍या उत्पादनातून व उरलेला निम्मा खर्च स्वतःच्या खिशातून करत येथील गायींचा सांभाळ करण्यात येतो. समाजातील दानशूर व्यक्तीही या कामी स्वेच्छेने मदत करतात.  भाकड गायीच्या गोमूत्रातही असाध्य आजार दूर करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे भटक्या किंवा आजारी गायी दिसल्या तर केंद्राई गोशाळेत आणून सोडा.  -  धनंजय गावडे, व्यवस्थापकीय संचालक, केंद्राई गोशाळा, चिंचवड.