Wed, Jul 17, 2019 20:12होमपेज › Pune › सातारारोड ‘बीआरटी’ची प्रतीक्षा

सातारारोड ‘बीआरटी’ची प्रतीक्षा

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 12:37AMपुणे : शिवाजी शिंदे 

सातारा रोड बीआरटी मार्गाचे सुरू असलेले काम अजुनही अपूर्णावस्थेत असून,या मार्गातून चालविण्यात येणार्‍या बसचालकांसह प्रवाशांना अनेक अडथळ्यांची शर्यत दररोजच पार करावी लागत आहे. त्यामुळे पूर्णपणे हा मार्ग केव्हा सुरू  होणार याची प्रतिक्षा पीएमपी प्रशासनासह प्रवाशांना देखील लागून राहिली आहे; दरम्यान 15 एप्रिलपर्यत हा मार्ग बसेससाठी उपलब्ध करून देण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र सध्या सुरू असलेल्या कामांची स्थिती पाहता या मार्गावरील काम पूर्ण होण्यासाठी कालावधी लागणार आहे.

सातारारोड बीआरटीचे काम मागील काही महिन्यांपासून अतिशय संथ गतीने सुरू आहे. स्वारगेटपासून कात्रजपर्यत सुमारे सात किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. या मार्गावर बीआरटीच्या नियमानुसार बसथांबे उभारणीचे काम सुरू आहे. साधारणपणे सात बसथांब्याचे काम सुरू आहे. काही बसथाब्यांचे काम अतिंम टप्प्यात आले आहे. तर काही बसथांबे अजूनही अपूर्णावस्थेत आहेत. 

स्वारगेटच्या जवळ असलेल्या बीआरटी मार्गावर एस.टी. महामंडळाच्या शिवशाही बसेससह खासगी वाहनांचे पार्किंग मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कात्रज कडून येणार्‍या आणि स्वारगेट कडून जाणार्‍या पीएमपीच्या बसेसना मोठ्या प्रमाणावर अडथळा ठरत आहे. तर व्होल्गा चौकातून पुढे मार्गाचे काम सुरू असल्यामुळे बहुतांशी ठिकाणी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. परिणामी सध्यातरी बसचालकांना कसरत करीतच बसेस वेड्यावाकड्या चालवाव्या लागत आहेत. याचा फटका प्रवाशांना चांगला बसत आहे. कोणती बस कोणीकडून येईल याचा अंदाज लागत नसल्यामुळे प्रवाशांना सारखी पळापळ करावी लागत असल्याचे दिसून आले. मार्गावर बहुतांशी ठिकाणी अजूनही जुनेच बसथांबे उभे आहेत. त्याचा अडथळा बसचालकांना होत आहे. हे जुने बसथांबे कुचकामी ठरले आहेत.

सातारा रोड बीआरटीचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. हे काम 15 एप्रिल पर्यत पूर्ण करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र अजून बरेच काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यास खूप कालावधी लागणार आहे.

मार्गाचे सेफ्टी आणि ट्रॅव्हल ऑडिट करणार 

सातारा रोड बीआरटी मार्गावर बस सुरू करण्यापूर्वी या मार्गाचे सेफ्टी आणि ट्रॅव्हल ऑडिट (प्रवास लेखापरीक्षण) करण्यात येणार आहे. तसेच प्रवाशी आणि चालक यांचाही विचार करण्यात येणार आहे. तसेच या मार्गावर इन्फ्रास्ट्रक्‍चर तयार करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, अशी  माहिती पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर यांनी दिली.

मार्ग पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा
पुणे महापालिकेने सातारा रोड बीआरटी मार्गाचे काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र सद्यस्थिती पाहता हे काम पूर्ण होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गावर बसेस धावण्यास सुद्धा वेळ लागणार आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे काम पूर्ण होण्यास विलंब लागलेला आहे. या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे  यासाठी पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे.  - सिद्धार्थ शिरोळे  पीएमपीचे संचालक 

 

Tags : pune, pune news, Satara Road BRT route, incomplete