होमपेज › Pune › पालिकेचे कामकाज यापुढे मराठी भाषेतूनच

पालिकेचे कामकाज यापुढे मराठी भाषेतूनच

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 07 2018 12:52AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व कामकाज केवळ राजभाषा मराठीतूनच करण्यात यावे, असा आदेश पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सर्व विभागप्रमुखांना गुरुवारी (दि.5) काढला आहे. मराठीचा वापर करण्यासंदर्भात जे अधिकारी आणि कर्मचारी टाळाटाळ करतील त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. 

शासनाच्या शासन व्यवहारत राजभाषा मराठीचा वापर करण्याबाबतचे 7 मे 2018 च्या परिपत्रकानुसार आयुक्तांनी हा आदेश पालिकेत सक्तीचा केला आहे. पालिकेतून होणारा सर्व पत्रव्यवहार व इतर कार्यालयीन कामकाज मराठी भाषेतून करणे अनिवार्य आहे. पालिका अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने दैनंदिन शासकीय कामकाज मराठी भाषेचा वापर करणे सोपे जावे, मराठी भाषा व्यवहाराची भाषा म्हणून वापरण्याकरिता सरकारच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यालयांकडून प्रकाशित केलेल्या विविध शब्दकोश, परिभाषा कोश यासारख्या साधनसामुग्रीची सविस्तर माहिती द्यावी. त्याच्या उपलब्धतेबाबतचा तपशील शासनाच्या निर्णयात नमूद करण्यात आला आहे. 

पालिकेच्या योजनांची माहिती देताना, चर्चा करताना, दूरध्वनीवर बोलताना, सभेत भाषण करताना, बैठकीत बोलताना, विविध विषयांचे सादरीकरण, नागरिकांना होणारा सर्व पत्रव्यवहार, पत्रे, परवाने, कार्यालयांतर्गत वापरल्या जाणार्‍या नोंदवह्या, प्रमाणनमुने, प्रपत्रे, नियमपुस्तिका, टिप्पण्या, नस्त्या, पत्रव्यवहारावरील शेरे, अभिप्राय, धोरणे, आदेश, अधिसूचना, प्रारुप नियम, आदेश, परिपत्रके, अहवाल, बैठकांची कार्यवृत्ते, संकेतस्थळे मराठी भाषेत असावीत.

कार्यालयातील नामफलकावर अथवा पत्रव्यवहारावर अधिकार्‍यांचे नाव मराठी भाषेत लिहिताना इंग्रजी आद्याक्षरांचे मराठीत भाषांतर न करता ती मराठीतूच लिहावीत. पदनामाचा उल्लेखही मराठी भाषेतच असावा. कार्यालयातील पाट्या, फलक मराठीतून असावेत. पालिका कामकाज, पत्रव्यवहारामध्ये, निमंत्रणपत्रिकेमध्ये आणि इतर बाबींसंदर्भात रेल्वे स्थानके, गावांची नावे यांच्या नावाचा उल्लेख करताना मराठी भाषेत देवनागिरी लिपित नावे लिहावीत. क्वचित प्रसंगी आवश्यक असल्यास मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून निमंत्रणपत्रिका असावी. पालिकेच्या जाहिराती व निविदा मराठी भाषेतच प्रसिद्ध करण्यात याव्यात. पदभरतीसाठी घेतल्या जाणार्‍या  परीक्षा मराठीतूनच घेण्यात याव्यात. समित्यांचे कामकाज, त्याचे अहवाल मराठी भाषेतच असावेत.  

संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणारी माहिती मराठी भाषेतून असावी. पालिकेतर्फे न्यायालयात दाखल करण्यात येणारे दावे मराठी भाषेतून दाखल करण्यात यावेत. दंड वसूलीच्या पावत्या, विविध परवाने, उद्याने, पर्यटनस्थळे इत्यादी ठिकाणी आकारण्यात येणार्‍या प्रवेश शुल्काच्या पावत्या मराठी भाषेतून देण्याची दक्षता घ्यावी. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने माहिती अधिकार, ई-निविदा, ऑनलाईन सेवा/पोर्टल मराठी भाषेत उपलब्ध असावे. ई-ऑफीस अंतर्गत रजा, हजेरीपत्रक (बायोमॅट्रीक) संदर्भात उपलब्ध केलेल्या सुविधा मराठीतून उपलब्ध असाव्यात, असे याबाबतच्या परिपत्रकात म्हटले आहे.

विभागप्रमुख असणार दक्षता अधिकारी

प्रत्येक विभागाचे विभागप्रमुख हे ‘मराठी भाषा दक्षता अधिकारी’ असणार आहेत. प्रत्येक विभागप्रमुखाने अधिकारी व कर्मचार्‍यांनी मराठी भाषेचा वापर करावा म्हणून दक्षता घ्यावयाची आहे. टाळाटाळ करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचा अधिकार दक्षता अधिकार्‍यांना दिला आहे.