Thu, Apr 25, 2019 21:59होमपेज › Pune › ‘पवित्र’च्या ‘पावित्र्या’वरच प्रश्‍नचिन्ह

‘पवित्र’च्या ‘पावित्र्या’वरच प्रश्‍नचिन्ह

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 1:11AMपुणे : गणेश खळदकर 

शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या अभियोग्यता आणि बुद्धीमापन चाचणीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता लवकरच शिक्षक भरती होणार, असे स्वप्न परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना पडू लागले आहे. पंरतु त्यांच्या स्वप्नावर विरजण पडणार असून ज्या पवित्र पोर्टलमार्फत ही शिक्षक भरती करण्यात येणार आहे. त्या पोर्टलचे काम अद्याप अर्धवटच अवस्थेत आहे. तसेच त्यातून होणार्‍या भरतीबाबत देखील अनेक शंका निर्माण झाल्या असून ‘पवित्र’च्या ‘पावित्र्या’वरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे जाहीर झालेल्या निकालात देखील विद्यार्थ्यांचे मार्क कमी झाले आहेत.

राज्य शासनाने शिक्षकभरतीसाठी पवित्र (Portal For Visible to All Teacher Recruitment)या संगणकीय प्रणालीच्या आधारे शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच राज्यात अभियोग्यता आणि बुद्धीमापन ऑनलाईन चाचणी घेण्यात आली. ही चाचणी दिल्यानंतरच विद्यार्थ्यांना गुण दिसले. पंरतु आता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे 1 किंवा 2 गुण कमी झाल्याचे निकालावरून दिसून येत आहे. चुकीच्या प्रश्‍नांचे गुण कमी केले, असे म्हणावे तर हे गुण 200 पैकीच दाखविण्यात येत आहेत. त्यामुळे गुण नेमके कमी कशामुळे झाले, असा प्रश्‍न विद्यार्थी विचारत आहेत.

सन 2012 मध्ये बंद झालेल्या शिक्षक भरतीनंतरही अनेक शाळांनी वैयक्तीक मान्यतांच्या व ना हरकत प्रमाणपत्रांच्या आधारे शिक्षक भरती केली. या भरतीमध्ये संस्थाचालक, अधिकारी आणि शिक्षक यांच्यात मोठ्या प्रमाणात अर्थिक गैरव्यवहार झाले. यातील तब्बल 4 हजार 11 मान्यता या दोषी असून देखील त्यांच्यावर कारवाईचे धाडस अद्याप कोणीही दाखवत नाही. त्यातच शिक्षक भरती पारदर्शकपणे व्हावी यासाठी पवित्रच्या माध्यमातून भरती करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. परंतु कोणतीही पूर्वतयारी न करता घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

भरतीसंदर्भात शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांची नियुक्ती कशी करायची यावरून अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामध्ये संस्था किती जागांची जाहिरात पोर्टलवर देणार, एकाच व्यक्तिने अनेक ठिकाणी अर्ज केल्यावर नियुक्ती कशी होणार, एकाच पदासाठी अनेक अर्ज आल्यावर निवड कशी होणार, महाविद्यालयांमध्ये ठराविक प्रवर्गांचेच आरक्षण आसते त्यामुळे इतर आरक्षित प्रवर्गांचे काय होणार आणि एवढे करूनही संस्थाचालक पैशाची मागणी करणार नाहीत याची खात्री कोण देणार तसेच संस्थाचालकाने उमेदवाराला हजरच करून घेण्यास नकार दिला तर त्यावर कोण कारवाई करणार, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे अद्याप अनुत्तरीतच आहेत. त्यामुळे तुर्तास तरी शिक्षक भरती लांबणीवर पडणार असून सध्या केवळ या प्रक्रियेवरच अधिकारी बैठका घेत आहेत. कारण यातील काही प्रश्‍नांची उत्तरे अधिकार्‍यांकडे देखील नसल्याचे सूत्रांनी सांगितले.