Mon, Jul 15, 2019 23:41होमपेज › Pune › प्लास्टिक बंदीला ‘कामायनी’चे विशेष मुले देतायेत पर्याय

प्लास्टिक बंदीला ‘कामायनी’चे विशेष मुले देतायेत पर्याय

Published On: Mar 20 2018 2:06AM | Last Updated: Mar 20 2018 1:39AMपुणे : नरेंद्र साठे

पर्यावरणाची हानी होत असल्याने, राज्यात प्लास्टिक वापरवार राज्य शासनाने निर्बंध घातले असून, त्याची अंमलबजावणी सोमवार (दि. 19) पासून करण्यात आली. प्लास्टिकवर निर्बंध आल्याने आता कागदी व कापडी पिशव्यांना मागणी वाढणार आहे. गेल्या काही वषार्र्ंपासून विशेष मुलांसाठी काम करणार्‍या ‘कामायनी’ या संस्थेने कापडी व कागदी पिशव्या तयार करण्याचे काम यापूर्वीच सुरू केले आहे. त्यामुळे विशेष बनवलेल्या पिशव्या प्लास्टिक बंदीवर पुणेकरांसाठी पर्याय ठरणार आहेत.

कामायनी संस्थेत 18 वर्षांपुढील 100 मुले या पिशव्या दिवसभर तयार करतात. कापडी पिशव्या या नागरिकांनी दिलेल्या जुन्या साड्या किंवा कपड्यांपासून बनवल्या जातात. शिक्षकांकडून या मुलांना प्रशिक्षण दिले जाते, त्यानंतर कापड कापून वेगवेगळ्या आकारांच्या पिशव्या हे मुले तयार करतात. शहरातील काही दुकानदारांकडून आणि नागरिकांकडून संस्थेला पिशव्या तयार करण्यास सांगितले जाते, त्यानुसार हे मुले पिशव्या तयार करतात. एक मुलगा वीस ते पंचवीस मिनिंटामध्ये एक पिशवी तयार करतो. दिवसाला 75 ते 80 कापडी पिशव्या तयार होतात, तर एका दिवसात ही मुले शंभरच्या पुढे कागदी पिशव्या तयार करतात.

शाररिक अपंगत्व बाजूला करून ही मुले कौशल्याने कापडी आणि कागदी पिशव्या बनवत असून, निरीक्षकाच्या देखरेखीत ही मुले उत्कृष्ट दर्जाच्या पिशव्या बनवतात. जुन्या साड्या, कपडे आणि वर्तमानपत्रांची रद्दी नागरिकांनी आणून दिल्यानंतर जास्तीत जास्त संख्येत पिशव्या नागरिकांना उपलब्ध करून देता येतील असे, संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. प्रत्येक शुक्रवारी बाहेरील व्यक्तींना संस्थेत प्रवेश दिला जातो. या वेळी नागरिक मुलांना पिशव्या बनवण्यासाठी जुने कपडे आणून देतात. या संस्थेबरोबरच शहरातील काही महिला बचत गटदेखील कापडी आणि कागदी पिशव्या बनवण्याचे काम करतात. 

प्लास्टिक पिशव्या विकत घेता...मग कापडी पण घ्या..

शॉपिंग मॉल, दुकानांमध्ये खरेदी केल्यानंतर पुणेकर प्लास्टिक पिशवीसाठी पाच-दहा रुपये मोजतात. त्याच पद्धतीने कापडी पिशव्या खरेदी करण्याची मानसिकता होण्याची आवश्यकता आहे. प्लास्टिक पिशव्यांच्या तुलनेत कापडी पिशवी पुन: पुन्हा वापरता येते. कापडी पिशवीची किंमत दहा ते पन्नास रुपये तर, कागदी पिशवीची दोन ते दहा रुपये किंमत असणार आहे.

आम्हाला जुने कपडे द्या...

पुणेकरांनी आम्हाला ऑर्डर द्यावी, त्यासाठी अगोदर जुने कपडे आणून दिले, तर मुले पिशव्या तयार करून देतील. मुलांना पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. कापडी पिशव्या तयार करताना कापड कापण्यापासून पिशव्या शिवण्याचे सर्व कामे हे संस्थेतील मुले-मुली करत आहेत. प्लास्टिक बंदीला कापडी पिशव्या पर्यायी ठरू शकतील. कापडी पिशव्या वापरल्याने प्लास्टिक बंदी यशस्वी होण्यात मदत होईल.  -कालिदास सुपाते,व्यवस्थापक, कामायनी उद्योग केंद्र
 

Tags : Pune, Pune News, Kamayani, Plastic,  paper bags,