Fri, Apr 26, 2019 20:10होमपेज › Pune › वाहतूक शाखेची परवानगी न घेताच पदपथांची कामे जोमात

वाहतूक शाखेची परवानगी न घेताच पदपथांची कामे जोमात

Published On: May 11 2018 1:34AM | Last Updated: May 11 2018 1:33AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील पेठांसह इतर ठिकाणी रस्त्यांवरील जुने पदपथ काढून त्याठिकाणी नव्याने जास्त रुंदीचे पदपथ करण्याचे काम मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने किंवा संबंधित ठेकेदाराने वाहतूक शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे गरजेचे होते, मात्र बहुतेक पथपदांच्या कामासाठी वाहतूक शाखेची एनओसी घेतली नसल्याचे समोर आले आहे. तसेच काम करणार्‍या ठेकेदारांकडून सुरक्षेसंबंधीचे नियमही सर्रासपणे धाब्यावर बसविल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुणे शहराचा समावेश झाल्यानंतर महापालिकेकडून स्मार्ट होण्यासाठी शहरात विविध उपक्रम आणि कामे राबविली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पेठांसह इतर ठिकाणी रस्त्यांवरील जुने पदपथ काढून त्याठिकाणी नव्याने जास्त रुंदीचे पदपथ करण्याचे काम मोठ्या धुमडाक्यात सुरू आहे. 

पदपथांची रुंदी वाढविण्यापूर्वी पालिकेने किंवा संबंधित ठेकेदाराने वाहतूक पोलिस शाखेची एनओसी घेणे बंधनकारक होते. मात्र महापौर बंगला, घोले रस्ता, झाशीची राणी पुतळ्यासमोरील गल्ली आणि डेक्कन परिसरातील रस्त्यांच्या पदपथांची रुंदी वाढविण्याची कामे सुरू करण्यापूर्वी वाहतूक शाखेची कोणत्याही प्रकारची एनओसी घेतली नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. ही स्थिती इतर पदपथांच्या संदर्भातही आहे. मात्र, महर्षिनगर पोलिस चौकी, गुलटेकडी, पुनावाला उद्यान, सॅलसबरी पार्क या ठिकाणी सुरू असलेल्या कामासाठी वाहतूक शाखेकडून एनओसी घेण्यात आल्याची माहितीही वाहतूक शाखेने दिली आहे. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते भरत जैन-सुराणा यांनी माहिती अधिकारात माहिती मागविली होती. 

शहरातील पदपथांची रुंदी वाढविण्यात येत असल्याने रस्त्यांची रुंदी आपोआप कमी होत आहे. दिवसेंदिवस गंभीर होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येत या कामामुळे भविष्यात वाढच होणार आहे. सध्या पदपथांची कामे सुरू असल्याने या कामासाठी लागणारे साहित्य आणि जुने पथपथ उखडल्यामुळे निर्माण झालेला राडारोडा रस्त्याच्याच बाजूला टाकला जात आहे. त्यामुळे भर उन्हात दुपारी आणि सकाळ, संध्याकाळी रस्त्यांवर वाहनांच्या रांगाच्या रांगा पाहायला मिळत आहेत. पदपथांची रुंदी वाढविली जात असल्याने रस्त्यांची रुंदी कमी होणार असल्याने भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

सुरक्षेच्या नियमांची एैशीतैशी

पदपथांचे काम सुरू करण्यापूर्वी संबंधित काम करणार्‍या ठेकेदाराने त्या भागातील वाहतूक पोलिस निरीक्षकाशी संपर्क साधणे बंधनकारक आहे. तसेच कामाचा वाहतुकीस आणि पादचार्‍यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी पर्यायी रस्त्याचा सुचनाफलक, काम करणार्‍या ठेकेदाराचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि काम केव्हा सुरू केले आणि केव्हा पूर्ण होणार या तारखांची नोंद असलेला फलक लावणे बंधनकारक आहे. खोदकाम सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत करणे गरजेचे आहे. मात्र ठेकेदारांकडून हे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहे.