Thu, May 23, 2019 20:56
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › हडपसर रेल्वे टर्मिनसचे काम जून 2019 पर्यंत पूर्ण

हडपसर रेल्वे टर्मिनसचे काम जून 2019 पर्यंत पूर्ण

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 19 2018 12:40AMनिमिष गोखले 

पुणे : हडपसर रेल्वे टर्मिनसचे काम जून 2019 अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. टर्मिनसचे काम सुरू झाले असून सद्यःस्थितीत स्थानक आवारातील इमारतीचे काम सुरू झाले असून ते प्रगतीपथावर आहे, असे सांगण्यात आले. दरम्यान, ‘नव्या सिग्नल यंत्रणेने टर्मिनस सुसज्ज होणार असून सध्या जुनी सिग्नल यंत्रणा काढून नवी सिग्नल यंत्रणा (नॉन इंटरलॉकिंग सिस्टिम) बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे’,  अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या बांधकाम विभागाचे उपमुख्य अभियंता आर. एन. गुप्ता यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.  

पुणे रेल्वे स्थानकाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी जवळपासच्या स्थानकाचा विचार करण्याची संकल्पना काही वर्षांपूर्वी मांडण्यात आली. हडपसरच्या आधी खडकी स्थानकाचा विचार करण्यात आला होता. मात्र, योग्य जागा उपलब्ध होऊ न शकल्याने खडकीचा पर्याय बासनात गुंडाळण्यात आला. त्यानंतर हडपसरचा पर्याय सर्वार्थाने योग्य वाटल्याने त्याची चाचपणी सुरू करण्यात आली. अखेर हडपसर टर्मिनसच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला व या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. सुरुवातीला सुमारे 24 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, प्रकल्पास झालेल्या विलंबामुळे सध्या या प्रकल्पाची किंमत 30 कोटींवर गेल्याची माहिती समोर आली आहे.  

दरम्यान, हडपसर टर्मिनसकरिता रेल्वे बोर्ड पुणे विभागाला 30 कोटी रुपये देणार असून सध्या यापैकी केवळ 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित निधी सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करण्यात येणार असून काम थांबता कामा नये, असा आदेश रेल्वे बोर्डाने दिला आहे. हडपसर रेल्वे स्थानक पुणे स्थानकापासून 6 किलोमीटर अंतरावर असून उत्तर भारतात जाणार्‍या गाड्या येथून सुटतील, अशी माहिती देण्यात आली. मात्र, हडपसर टर्मिनस बनविताना पुण्यातून तेथे पोहोचण्यास सक्षम वाहतूक पर्याय, स्थानक परिसरात सुसज्ज पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्यात यावी, असे मत रेल्वे तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

पुणे स्थानकावरून दररोज सुमारे दोनशे रेल्वे ये-जा करतात. त्याचप्रमाणे दोन लाख प्रवासी प्रवास करतात. प्लॅटफॉर्म उपलब्ध न झाल्याने अनेक रेल्वेंना लाल सिग्नल देण्यात येतो, त्यामुळे प्रवाशांचा नाहक वेळ वाया जातो. हडपसर टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यानंतर मात्र तेथून काही गाड्या सोडण्यात येणार असल्याने पुणे स्थानकावर येणारा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, रेल्वेच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर या टर्मिनसची उभारणी करण्यात येत असून प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्यात आणखी जागा लागल्यास जमीन हस्तांतरणाचा विचार करू, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.