Tue, Jan 22, 2019 01:27होमपेज › Pune › कामकाज मराठीतून नाहीच

कामकाज मराठीतून नाहीच

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 10 2018 11:50PMपुणे : राज्य सरकारने राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये हिंदी, इंग्रजीसह मराठी भाषेचा वापर बंधनकारक केला आहे. दि. 7 डिसेंबर 2017 रोजी राज्य सरकारने रेल्वे, बँक, टपाल, विमानतळ, मेट्रो आदी सरकारी कार्यालयांसह स्थानकांवर मराठीचा वापर सक्तीचा करण्यात यावा, असे सांगितले होते. या आदेशाला सहा महिन्यांहून अधिकचा काळ लोटला असूनही, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने राज्य सरकारचा हा आदेश पायदळी तुडवल्याचे दिसून येत आहे.  

पुणे स्टेशनवरील मुख्य प्रवेशद्वार, शिवाजीनगर स्थानक, पुणे स्टेशनवरील पार्सल ऑफिस येथील पादचारी पुलावर अद्यापही हिंदी पाट्या आहेत. ज्यांना मराठी येत नाही, अशांची या मुळे प्रचंड गैरसोय होते. मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावरही मराठीचा पत्ता नाही. तेथे केवळ हिंदी व इंग्रजीचाच पर्याय देण्यात आला आहे. 1 मेपासून तिकिटावरील मजकूर मराठी भाषेतदेखील लिहिला जाईल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र मुंबई वगळता याची अंमलबजावणी झालीच नाही. 

रेल्वेचा आरक्षण फॉर्म नुकताच मराठीत उपलब्ध झाला आहे. परंतु हिंदी व मराठी एकाच पानावर व इंग्रजीला स्वतंत्र पान देण्यात आले आहे. त्यामुळे मराठीचा मजकूर अत्यंत लहान अक्षरात दिला गेल्याने तो नीट वाचता येत नाही. पत्रकारांना पाठविण्यात येत असलेल्या प्रेस नोटदेखील हिंदी व इंग्रजीतच असतात. ‘संबंधित विभागाला मराठीच्या वापराकरिता सूचित करण्यात येईल’, असे उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिले आहे.