Tue, Apr 23, 2019 19:33होमपेज › Pune › बडा शिगरी ग्लेशियरमधील मोहीम यशस्वी

महिलांनी फडकाविला कॅथेड्रल शिखरावर तिरंगा

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 12:41AMपुणे ः प्रतिनिधी

पुण्यातील प्रमुख गिर्यारोहण संस्था गिरीप्रेमीच्या 7 जणांच्या संघाने बडा शिगरी ग्लेशियरमध्ये स्थित 5900 मीटर उंच माउंट कॅथेड्रल शिखरावर तिरंगा फडकाविला. युवा गिर्यारोहक विवेक शिवदेच्या नेतृत्वाखाली संघाने ही कामगिरी केली. शिखर चढाई पूर्ण करणार्‍या गिर्यारोहकांपैकी दोन महिला गिर्यारोहक आहेत, हे विशेष.

बडा शिगरी मोहीम ही गिरीप्रेमींसाठी खास मोहीम होती. या मोहिमेमध्ये सहभागी 9 गिर्यारोहकांपैकी 6 गिर्यारोहक हे पहिल्यांदा अति उंचीवरील मोहिमेसाठी गेले होते. शिवदेसोबत, एव्हरेस्ट शिखरवीर कृष्णा ढोकले, जितेंद्र गवारे, वरून भागवत, रोहन देसाई, संयमी टकले व प्रियांका माने यांनी शिखर मोहीम यशस्वी केली. संघातील अमित तळवळकर व 51 वर्षीय अंजली कात्रे यांना शिखरमाथ्यावर पोहोचता आले नाही. मात्र, चढाईदरम्यान अंजली कात्रे यांनी दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी होती. हिमाचल प्रदेशातील चंद्रा व्हॅलीमध्ये लाहौल स्पिती भागामध्ये स्थित बडा शिगरी ही गंगोत्रीनंतर दुसरी मोठी हिमनदी आहे. 30 किलोमीटर लांबीची हिमनदी उत्तर दिशेकडे वाहत जात पुढे जाऊन चिनाब नदीमध्ये परावर्तित होते. बडा शिगरी हिमनदीच्या परिसरात अनेक उंच शिखरे असून हिमनदीची कमीत कमी उंची 3950 मीटर एवढी आहे.

गिरीप्रेमीच्या संघाने बडा शिगरी मोहिमेची सुरुवात मनालीमधून केली. रोहतांग पास पार करत स्पिती स्थित बेसकॅम्पपर्यंत पोहोचले. मनाली ते बेसकॅम्प हा प्रवासदेखील खडतर आहे. यासाठी संघाला तब्बल 3 दिवस लागले. हिमनदीच्या मुखाजवळ असलेल्या बेसकॅम्पपर्यंत पोहोचण्यासाठी कर्छा नाला नावाचा अत्यंत वेगाने वाहणार्‍या ओढ्याला पार करणे गरजेचे होते. रिव्हर क्रॉसिंग तंत्राचा वापर करून संघाला हा नाला पार करावा लागला. असे सर्व अडथळे पार करत संघ बेसकॅम्पला पोहोचला. यापुढे असणारा चढाईचा प्रवास देखील अत्यंत कठीण होता. समिट कॅम्पआधी 60 फुटांची व 70 अंश कोनातील हिमाच्छादित भिंत पार करायची होती. गिरीप्रेमीच्या संघाने गिर्यारोहणातील कौशल्याचे उत्तम प्रदर्शन करून 4 ऑगस्ट रोजी पहाटे सहा वाजता शिखरमाथा गाठला. 

चढाईदरम्यान मोठ्या हिमभेगा व हिमनदीमुळे तयार झालेले टोकदार बर्फ यांच्यामुळे चढाई अत्यंत कठीण होती, मात्र गिरीप्रेमींच्या संघाने सर्व आव्हाने सक्षमपणे झेलून मोहीम यशस्वी केली. लाहौल स्पिती भागातील ही गिरीप्रेमींची सलग दुसरी यशस्वी मोहीम आहे. 2017 साली विवेक शिवदेच्याच नेतृत्वाखाली सीबी 13 (6264 मीटर) शिखरावर मोहीम यशस्वी केली होती. बडा शिगरी मोहिमेला ज्येष्ठ गिर्यारोहक व श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे व ज्येेष्ठ गिर्यारोहक अविनाश फौजदार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मनालीमधील खेमराज ठाकूर यांच्या ‘माउंटन एक्स्पेडीशन’ने मोहिमेत सहाय्य केले. गंगाराम ठाकूर, बाळकृष्ण ठाकूर, मोहर सिंह व उमेश रैना यांनी मोहिमेदरम्यान चढाई मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली.

माउंट एल्ब्रूस व माउंट स्टोक कांगरी मोहिमांचे यश

याचसोबत गिरीप्रेमीची संलग्न संस्था असलेल्या ‘गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग (जि.जि.आय.एम) मार्फत आयोजित रशियास्थित युरोप खंडातील सर्वात उंच शिखर ‘माउंट एल्ब्रूस’(5642 मीटर) येथे गिरीप्रेमीचा गिर्यारोहक  दिनेश कोतकर याच्या नेतृत्वाखालील 4 जणांच्या संपूर्ण संघाने मोहीम यशस्वी केली. तर स्टोक कांगरी हिमालयातील या 6153 मीटर उंच शिखरावरील मोहीम गिरीप्रेमीचा प्रमुख गिर्यारोहक डॉ. सुमित मांदळे याच्या नेतृत्वाखाली 7 जणांनी शिखरमाथा गाठला.