Fri, May 24, 2019 20:32होमपेज › Pune › सक्षम व्यवस्थेअभावी महिलांची फरपट

सक्षम व्यवस्थेअभावी महिलांची फरपट

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 10 2018 12:41AMपुणे : ज्योती भालेराव-बनकर 

घरगुती वापराच्या वस्तू विकण्याचा व्यवसाय करणार्‍या संगीताताई आळंदीवरून रोज बसने प्रवास करतात. सकाळी 10 ला निघताना आणि रात्री परतीच्या 9 वाजेच्या बसने घरी निघतात. दोन्ही वेळेला त्यांना खचाखच भरलेल्या बसचा सामना करावा लागतो. हातातील सामानाच्या पिशव्या सांभाळत, रोजच करावा लागणारा हा प्रवास त्यांंच्यासाठी कसोटी पाहणारा असतो. अनेक वेळा बसायला जागा मिळत नाही. धक्काबुक्की, कंडक्टरची अरेरावी, पुरुष प्रवाशांचा होणारा त्रास, अशा अनेक समस्यांचा पाढाच या वेळी त्यांनी वाचला.  

नोकरी, शिक्षण या कारणांमुळे महिलांना, मुलींना रोजच शहरातील विविध भागातून प्रवास करावा लागतो. कोणी दुचाकीने तर कोणी पीएमपीएल, रेल्वेने प्रवास करतात. या प्रवासात त्यांना कोणत्या अडचणी, समस्यांना तोंड द्यावे लागते याचा आढावा घेताना अनेक मुलींनी त्यांच्या समस्या दैनिक ‘पुढारी’कडे मांडल्या.

लोहगाववरून बसने पुण्यात येणारी प्रिया राठोड तर बस ड्रायव्हर आणि बसमधील लोकांचे अनेक किस्से सांगते. ड्रायव्हर दारू पिऊन, हेडफोन लावून गाणी ऐकत कशीही गाडी चालवतात. बसमध्ये जितके सिट तितकेच लोक चढण्यास परवानगी असावी, तरच आमचा प्रवास सुकर होईल, असे तिचे मत आहे. अनेक मुलींना पुरुष प्रवासी त्रास देताना आढळत असल्याचेही तिने सांगितले. 

उरुळीकांचनवरून पुण्यात बसने प्रवास करणारी कोमल पंडित सांगते, सुरक्षेच्या बाबतीत तसे हे शहर ‘सेफ’ आहे. मात्र, लोकसंख्येच्या मानाने गाड्यांची असलेली उपलब्धता खूपच कमी आहे. बसमधे रात्री जाताना इतकी गर्दी असते, की हलायलासुद्धा जागा राहात नाही. 

कॉलेज आणि जॉब अशा दोन्ही कारणांसाठी तळेगाववरून पुण्यात ये-जा करणारी प्रणाली कोद्रे म्हणाली की, बस आणि लोकल यांची संख्या कमी असल्याने सकाळ आणि संध्याकाळी गर्दीचा सामना करावा लागतो. आयत्या वेळी लोकल रद्द होतात, उशिरा येतात यामुळेही खूप हाल होतात. गर्दीमुळे चोर्‍या, धक्काबुक्की हे प्रकार नेहमीच घडतात. रात्री 10 नंतर प्रवास जास्त असुरक्षित वाटतो.

आपल्या दुचाकीने प्रवास करणारी माधवी सांगते, पूर्वी मी बसने प्रवास करायचे. बसमधे गर्दी, धक्काबुक्की, नको ते स्पर्श करण्याचे प्रमाण खूप होते आणि आता स्वत:च्या गाडीवर जाताना काही मुले कशीही गाडी चालवत, कट मारत जातात. अशी ‘रॅश’ गाडी चालवणार्‍या मुलांवर कधीच काही कारवाई होताना दिसत नाही. ट्रॅफिक रुलही पाळले जात नाहीत. मुजोर वाहनचालकांची मनमानी चाललेली असते. 

लोकसंख्येच्या प्रमाणात बस आणि इतर सार्वजनिक वाहनांची कमी हेच प्रवासातील समस्यांचे मूळ असल्याचे मुलींनी सांगितले. वाहनांच्या संख्येत वाढ, सुरक्षित वातावरण मिळाले तर प्रवास सुकर होणार आहे. बसमध्ये महिलांसाठीच्या आरक्षित जागा न मिळणे, अस्वच्छता, पुरुषांची, कंडक्टरची अरेरावी, रस्त्यावरील टवाळखोर मुलांचा त्रास, अशा अनेक समस्यांना तोंड देत मुली आपले शिक्षण, नोकरी करत आहेत. प्रशासनाने त्यांच्या लहान-मोठ्या समस्यांची दखल घ्यावी, अशी मागणी त्या करीत आहेत.