Wed, Jun 26, 2019 17:27होमपेज › Pune › नैराश्यातून उचलले पाऊल; चौघांवर गुन्हा 

पेट्रोल अंगावर ओतून घेऊन महिलेची आत्महत्या

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 19 2017 1:00AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

दोन वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍या तरुणाने लग्नाला नकार देऊन दुसर्‍याच मुलीशी लग्न केले. त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी अशोभनीय वर्तन; तसेच शिवीगाळ केल्याच्या निराशेतून 33 वर्षीय महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह चौघांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपाली प्रवीण उके (33, घुलेनगर, मांजरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सागर कृष्णदेव माने (रा. आमराई रोड, केशवनगर, मुंढवा) व वडील कृष्णदेव माने, सागर याची बहीण सुनीता आणि आणखी एक अशा चौघांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला हडपसर परिसरातील एका ब्यूटिपार्लरमध्ये नोकरी करत होती; तर माने हा रिक्षा चालवत होता. सध्या तो काही करत नाही. त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर ते गेल्या दोन वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहात होते. दोघेही लग्न करणार होते. मात्र, त्यानंतर सागर याने लग्न करण्यास नकार दिला व दुसर्‍या मुलीशी लग्न केले. ही बाब समजल्यानंतर दीपाली सागरला भेटली. त्या वेळी त्याने लग्न केल्याचे सांगितले.

दरम्यान, सागर याच्या वडील व बहिणीने दीपाली हिला सागरचे लग्न झाले आहे. तूसुद्धा लग्न कर. आमच्या मुलाचे वाटोळे करू नको. झाले गेले विसरून जा, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच, हाताने मारहाण करत अशोभनीय वर्तन केले. या नैराश्यातच दीपाली यांनी  पेट्रोल घेऊन सागर माने याच्या घरी गेल्या. त्यांनी सागर याला आवाज दिला; परंतु तो बाहेर आला नाही. त्यानंतर त्याचे नातेवाईक बाहेर आले. त्या वेळी त्यांनी बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेतले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले.  त्यानंतर हा प्रकार समोर आला. दरम्यान, दीपाली यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास मुंढवा पोलिस करीत आहेत.