Sun, May 26, 2019 12:56होमपेज › Pune › कामावर जाणार्‍या महिलेस लुबाडले

कामावर जाणार्‍या महिलेस लुबाडले

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 1:20AMयेरवडा : वार्ताहर

सकाळी साडेसातच्या सुमारास शाळेत आणि कामावर जाणार्‍यांची वर्दळ असताना नगर रस्त्यावरील गजबजलेल्या हयात हॉटेलसमोरील चौकात शुक्रवारी दुचाकीवरून कामावर निघालेल्या महिलेला सिनेस्टाईल लुबाडण्यात आले. दुचाकीवरून या महिलेचा पाठलग केला गेला व तिच्या गाडीला धक्‍का देऊन तिला पाडल्यानंतर गळ्यातील तब्बल चार तोळ्यांचे दागिने हिसकावून चोरट्याने पोबारा केला. हा चोरटा या रस्त्यावरून जाणार्‍या कुणाच्याही हाती लागला नाही. भर दिवसा घडलेल्या या घटनेने शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

शालु राजेंद्र किथानी (49, रा. फ्लॅट नं. ए-19, श्रावणी गार्डन सोसायटी, गणपती चौक, इंटरविडा स्कूलजवळ, विमाननगर) यांनी या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून तक्रार दिली आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिलेली माहिती अशी, किथानी या कल्याणीनगर येथील एन. एम. मेडिकलमध्ये काम करतात. त्यांची कामाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 4 अशी आहे. 

त्या दुचाकीवरून (एमचएच 12, एचएच 9178) नेहमी याच रस्त्यावरून कामावर ये-जा करीत असतात. आज (शुक्रवारी) सकाळी पावणेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्या कामावर जाण्यासाठी निघाल्या. फिनिक्स मॉल चौकातून उजवीकडे वळून पुण्याकडे जाणार्‍या नगर रोडवरून जाताना हयात हॉटेल चौकात अचानक त्यांच्या मागून उजव्या बाजूने एक काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून एक अनोळखी इसम आला. त्याने किथानी यांना जोरात धक्‍का देऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेऊन पसार झाला. 

चोरट्याने धक्‍का दिल्याने किथानी यांचा तोल गेला. त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरून चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो वेगात निघून गेला. यानंतर किथानी यांनी सदर घटनेबाबत पोलिसांना फोनवरून माहिती दिली. सुमारे 80 हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे एक सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे मणी, सोन्याचे पदक असा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. किथानी यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार, चोरट्याची उंची अंदाजे पाच फूट सात इंच अशी आहे, अंगाने सावळा असून, मजबूत बांधा आहे. अंगात त्याने निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते.

या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे म्हणाले, सदर घटना गंभीर असून, चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहेत. त्यावरून तपासासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. पाळत ठेवून चोरट्याने हे काम केले, असा अंदाज आहे. लवकरच चोरट्यास जेरबंद करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.