Tue, Mar 19, 2019 15:34होमपेज › Pune › फ्लॅट पाहण्यास आलेल्या महिलेचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

फ्लॅट पाहण्यास आलेल्या महिलेचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी

सिंहगड रोड परिसरातील धायरी येथे सुरू असणार्‍या पार्क व्ह्यू बांधकाम साईटवर बुकिंग केलेला फ्लॅट पाहण्यासाठी पतीसोबत आलेल्या महिलेचा सहाव्या मजल्यावरून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याचे  समोर आले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. याप्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजरवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मानसी यांना तीन महिन्याचे बाळ आहे. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली.

मानसी विशाल दाभाडे (वय 28, रा. पौड फाटा, कोथरूड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नीलेश प्रकाश जोशी (वय 38, रा. रघुकुल नगरी, औंध रोड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. सहायक निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तक्रार दिली आहे. 

धायरी येथील चव्हाणनगर भागात पार्क व्हयु या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी मानसी यांच्या पतीने फ्लॅट बुक केला आहे. आरोपी नीलेश जोशी हा याठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. मानसी यांचे पती एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत.  दरम्यान मानसी व त्यांचे पती हे  दि. 4 मार्च रोजी हा बुकींग केलेला फ्लॅट पाहण्यासाठी आले होते. त्यांनी बुक केलेला फ्लॅट पाहिला. फ्लॅट पाहिलेल्या इमारतीच्या शेजारी आणखी एका इमारतीचे काम सुरू असून, तेरा मजली इमारत उभारण्यात आली आहे.

मात्र, त्याचे काही काम सुरू आहे. दरम्यान दि. 4  मार्च रोजी रविवार असल्यामुळे काम बंद होते. काम बंद असल्यानंतर सुरक्षितेसाठी जाळी लावली नाही. तसेच, बाल्कनीला रेलिंग लावले नाही. दरम्यान मानसी या त्यांनी बुक केलेला फ्लॅट पाहिला. त्यानंतर त्या दुसर्‍या इमारतीमध्ये गेल्या. त्या सहाव्या मजल्यावर गेल्या. त्यावेळी त्यांचा अचानक तोल गेल्यामुळे त्या खाली पडल्या. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.   तपास सहायक निरीक्षक गडकरी या करीत आहेत.