Mon, Jul 15, 2019 23:42होमपेज › Pune › वडगावात इच्छुकांना नगरसेवकपदाचे डोहाळे 

वडगावात इच्छुकांना नगरसेवकपदाचे डोहाळे 

Published On: May 01 2018 1:22AM | Last Updated: May 01 2018 12:33AMवडगाव मावळ : गणेश विनोदे

प्रारूप प्रभाग रचना व आरक्षण सोडतीनंतर खर्‍या अर्थाने वडगाव शहरामध्ये नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून इच्छुकांना नगरसेवक होण्याचे डोहाळे लागले आहेत. परंतु, ज्या पदामुळे निवडणुकीची गणिते ठरणार आहेत त्या ‘नगराध्यक्ष‘ पदाच्या आरक्षण सोडतीमुळे तयारीचे घोडे अडले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 4 फेबु्रवारीला ग्रामपंचायत बरखास्त होऊन वडगाव नगरपंचायत स्थापन झाली, परंतु, निवडणूक लगेच होणार कि पुढे जाणार याची निश्‍चीती नसल्याने तापलेले वातावरण शांत झाले होते. परंतु, राज्य निवडणूक आयोगाने दि.20 मार्चला वडगाव नगरपंचायतीचा प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर केला आणि पुन्हा वातावरण तापू लागले.

दरम्यान, दि.13 एप्रिलला प्रारुप प्रभाग रचना व आरक्षन सोडत जाहिर झाल्यानंतर खर्‍या अर्थाने निवडणूकीचे वारे वाहू लागले. आरक्षण सोडतीमुळे शहरातील दिग्गजांची दांडी गूल झाली असली तरी सर्वसाधारण महिला, नामाप्र, नामाप्र महिला या जागांवर दावा करत अनेकजण रिंगणात उतरले आहेत.प्रभाग 1 हा अनुसुचित जमातीसाठी तर प्रभाग 7 व 14 हे अनुसुचित जातीसाठी आरक्षीत झाल्याने या प्रभागातील वातावरण काहीसे शांत झाले असून प्रभाग 2, 9, 12 व 15 यामध्ये सर्वसाधारण जागा राहिल्याने इच्छुकांची गर्दी वाढली आहे. तर सर्वसाधारण स्त्री साठी राखीव झालेल्या प्रभाग 6,10,13,16 व 17 मध्येही दांडी गूल झालेल्या दिग्गजांनी घरातील महिलांना पुढे काढून नगरसेवक पद खेचण्याची तयारी सुरु केली आहे.

याशिवाय, या ना त्या मार्गाने नगरसेवक पद मिळाले पाहिजे या अपेक्षेने काही ÷इच्छुकांनी नामाप्र साठी राखीव झालेल्या प्रभाग 4, 11 किंवा नामाप्र स्त्री साठी राखीव झालेल्या प्रभाग 3,5 व 8 मध्ये ‘कुणबी‘ दाखल्यावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. नगरसेवक होण्यासाठी इच्छुक असणार्‍या उमेदवारांनी विविध उपक्रम व सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचारही सुरु केला असल्याचे पहायला मिळत आहे.दरम्यान, शहरातील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे या प्रमुख पक्षांनी निवडणूकीच्या दृष्टीने तयारीही सुरु केली असून काही ठिकाणी उमेदवारही निश्‍चित झाले आहेत. परंतु, भाजपा, शिवसेना युती व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होणार कि नाही हे अद्याप अस्पष्ट असल्याने काही उमेदवार अजूनही गॅसवर आहेत.

सोडतीनंतर युती आघाडी

प्रमुख पक्षांची जुळवाजुळव, युती-आघाडीचा निर्णय हा ‘नगराध्यक्ष’ पदाच्या सोडतीनंतरच होण्याची शक्यता असल्याने बहुतेक जणांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न आता या सोडतीवर अडले असल्याचे दिसते. कारण या सोडतीनंतरच आगामी निवडणुकीची गणिते ठरणार आहेत.

Tags ; Pimpri, wishes,  corporator