Mon, Aug 19, 2019 09:17होमपेज › Pune › किडनीच्या रूपाने ती झाली पतीशी एकरूप

किडनीच्या रूपाने ती झाली पतीशी एकरूप

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 24 2018 1:11AMहडपसर : प्रमोद गिरी

अवघ्या 34 व्या वर्षी निर्व्यसनी असलेल्या पतीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने आभाळच कोसळलेल्या आधुनिक सावित्रीने अतिशय खंबीरपणे या संकटाशी मुकाबला करीत आपली किडनी पतीला दान केली आणि ती खर्‍या अर्थाने पतीशी एकरूप झाली.

सध्या माणूस माणसापासून दुरावत चालला आहे, नाती अतिशय ठिसूळ बनत चालली आहेत, स्वार्थापुढे रक्ताची नाती दुरावत असल्याचा अनुभव पदोपदी येतो आहे, असे असताना पुण्यातील मुंढवा भागात अवघ्या 30 वर्षीय पत्नीने आपल्या 34 वर्षीय पतीला किडनी देऊन त्याला नवीन जीवन दिल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. दत्तात्रय आसाराम सुरवसे व त्याची पत्नी सुरेखा (रा. नागडगाव, ता. माजलगाव, जि. बीड) हे काही वर्षापूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात आले. 

मिळेल ते काम करून मुंढवा भागात राहू लागले. दीड वर्षापूर्वी दत्तात्रय याला सर्दी, खोकला सुरू झाला. कितीही उपचार केले तरी तो कमी होत नसल्याने सहकार्‍यांनी त्याला चांगल्या दवाखान्यात दाखवण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे दत्ता आणि सुरेखा हडपसर येथील नोबल हॉस्पिटलमध्ये गेले. तेथील डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असता दत्तात्रय याच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे निष्पन्न झाले. या निदानाने या दाम्पत्याच्या डोक्यावर आभाळच कोसळले. दोघांची अवस्था पाहून नोबल रुग्णालयातील डॉक्टर सुनील जावळे यांनी दोघांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 

डॉक्टरांच्या सल्ल्याने डायलेसीस सुरू करण्यात आले, पण दत्तात्रयच्या प्रकृतीमध्ये म्हणावी तशी सुधारणा होत नव्हती. आर्थिक परिस्थिती नाजूक असली तरी दोघांनीही हिंमत सोडली नाही. किडनी प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याचे डॉ. जावळे यांनी त्यांना सांगितले. किडनी विकत घेण्याचा तर विषयच नव्हता. अखेर सुरेखाने हिंमत दाखवून, पतीला स्वतःचीच किडनी देण्याची तयारी दर्शवली. निर्णय धाडसी होता, पण पर्याय नव्हता. यासाठी बरेच खल झाले. पण, ‘माझे कुंकू वाचवण्यासाठी मीच किडनी देणार’, अशी भूमिका तिने घेतली. निर्णय होताच तपासण्या सुरू झाल्या. एकीकडे विविध तपासण्या आणि दुसरीकडे कागदपत्रे जमा करणे असे सर्व युद्धपातळीवर कामे सुरू झाली. विशेष म्हणजे तिची किडनीही ‘मॅच’ झाल्याने पहिला अडथळा पार पडला होता.

अखेर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची तारीख निश्चित झाली. डॉ. जावळे यांनी नातेवाईकांना बोलावून घेऊन, त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली आणि  डॉक्टरांच्या टीमने त्यांचे काम चोख पार पाडले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सध्या दोघेही नोबल हॉस्पिटलमध्ये आहेत. दोघांची प्रकृती चांगली असून, त्यांना सक्षमतेने पुढील आयुष्य आनंदाने जगता येईल, असा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे.

मदतीचे आवाहन

सुरेखा व दत्तात्रय यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यांना एक मुलगा (वय 2) आहे. काम केल्याशिवाय पर्याय नाही. आतापर्यंत मिळेल त्या मदतीच्या आधारे रुग्णालयाचा खर्च करण्यात आला आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी या दाम्पत्याला मदत करावी, असे आवाहन नोबल हॉस्पिटलचे वैद्यकीय समुपदेशक विशाल तोरडे यांनी केले आहे.

मला माझी पत्नी सुरेखामुळे नवीन जीवन मिळाले आहे. मला प्रत्येक सुख -दुःखात तिने साथ दिली. एकवेळ तर मी सर्व आशा सोडून दिली होती, पण तिने धीर आणि आधार दिला, त्यामुळेच मी आज जगात आहे.   - दत्तात्रय सुरवसे.

मी पतीला किडनी देऊन फार मोठे काही केलेले नाही. लग्नात घेतलेल्या शपथेप्रमाणे त्यांच्यासोबत राहिले.  त्यांच्याशिवाय आयुष्याची मी कल्पनाच करू शकत नाही. त्यांची अर्धांगिनी म्हणून मला जे करता आले तेवढे केले, एवढेच. - सुरेखा सुरवसे.