Wed, Jul 17, 2019 20:02होमपेज › Pune ›  पाणीपट्टी दर अडीचवरून चार रुपये 

 पाणीपट्टी दर अडीचवरून चार रुपये 

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 23 2018 12:55AMपिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील कुटुंबांसाठी (सदनिका) प्रतिमहिना 6 हजार लिटरपर्यंत पाणी वापरास प्रति 1 हजार लिटरसाठी 4 रुपये पाणीपट्टी दर निश्‍चित करण्यात आला आहे. अधिक पाणी वापर करणार्‍या कुटुंबांना प्रति हजार लिटरला 35 रुपयांपर्यंत दर मोजावा लागणार आहे, तर व्यावसायिक वापरासाठी 1 हजार लिटरसाठी सरसकट 50 रुपये, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये व रुग्णालये, रेल्वे स्थानकांसाठी 1 हजार लिटरसाठी सरसकट 15 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.  

पाणीपुरवठ्यावर होणारा देखभाल व दुरुस्तीसाठी मोठा खर्च होत असून, त्या तुलनेत मिळणारे उत्पन्न अल्प आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील कुटुंबासाठी 1 ते 6 हजार लिटर पाण्यासाठी प्रति 1 हजार लिटरसाठी 4 रुपये दर आकारला जाणार आहे. 6001 ते 15 हजार लिटर पाणी वापरास प्रति 1 हजार लिटरला 8 रुपये, 15 हजार 1 ते 22 हजार 500 लिटरसाठी प्रति 1 हजार लिटरला 15 रुपये, 22 हजार 501 ते 30 हजार लिटरसाठी प्रति 1 हजार लिटरला 25 रुपये शुल्क निश्‍चित केले आहे, तर 30 हजार 1 लिटरच्या पुढे प्रति लिटरला 35 रुपये शुल्क आकारले जाणार आहे; तसेच मीटर रीडिंगप्रमाणे आकारणी करताना प्रत्येक कुटुंबासाठी कमीत कमी 200 प्रति महिना म्हणजे वार्षिक 2 हजार 400 अशी आकारणी केली जाणार आहे.

हॉटेल्स, रेस्टॉरंट व दुकाने या व्यावसायिकांसाठी प्रति 1 हजार लिटरसाठी सरसकट 50 रुपये दर निश्‍चित केला आहे. खासगी शैक्षणिक संस्था, शासकीय-निमशासकीय कार्यालये, रेल्वे स्थानके, ईएसआय रुग्णालय, उरो रुग्णालयाला प्रति 1 हजार लिटरसाठी सरसकट 15 रुपये पाणीपट्टी आकारली जाणार आहे. धार्मिकस्थळे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या मान्यता असलेल्या ना नफा ना तोटा तत्त्वावरील मंडळांना व महापालिका इमारती व मिळकतींसाठी प्रति 1 हजार लिटरसाठी सरसकट 10 रुपये आणि स्टेडियमसाठी हा दर सरसरकट 20 रुपये असणार आहे. 

झोपडपट्टीतील व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील कुटुंबांना 1 ते 6 हजार लिटर पाणी वापरासाठी प्रति 1 हजार लिटरसाठी 3 रुपये, 6 हजार 1 ते 15 हजार लिटर पाणी वापरासाठी प्रति 1 हजार लिटरसाठी 4 रुपये, 15हजार 1 ते 22 हजार 500 हजार लिटर पाणी वापरासाठी 6 रुपये, 22 हजार 501 ते 30 हजार लिटर वापरासाठी प्रति लिटर 10 रुपये पाणीपट्टी दर निश्‍चित केला आहे. मीटर न बसविलेल्या झोपडपट्टी व पुनवर्सन प्रकल्पातील एका कुटुंबासाठी वर्षाला दीड हजार रुपये पाणीपट्टी घेतली जाणार आहे. 

दरम्यान, सध्या कुटुंबासाठी 1 हजार लिटरसाठी अडीच रुपये पाणीपट्टी आहे. पाणीपुरवठा विभागाने पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा प्रस्ताव येत्या स्थायी समिती सभेत ठेवला आहे. 

नळजोड नियमितीकरणासाठी 9 हजार 300 शुल्क

कुटुंबासाठी अनधिकृत 15 मिलिमीटरचा नळजोड नियमित करण्यासाठी अनामत रक्कम 2 हजार रुपये, दंड 3 हजार, मागील पाणी वापराची पाणीपट्टी 4 हजार 300 रुपये असे एकूण 9 हजार 300 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर अनधिकृत नळजोड अधिकृत होणार आहेत. 30 जूननंतर अर्ज केल्यास प्रतिमहिना 200 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. व्यावसायिक अनधिकृत नळजोडासाठी अनामत रक्कम 8 हजार, दंडासह पाणीपट्टी 19 हजार 800 असे एकूण 27 हजार 800 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. 30 जूननंतर प्रत्येक महिन्यास दीड हजार रुपये अतिरिक्त शुल्क असणार आहे.