Fri, Jul 19, 2019 07:08होमपेज › Pune › पाणीटंचाईवरून सत्ताधारी नगरसेवकाचा घरचा आहेर

पाणीटंचाईवरून सत्ताधारी नगरसेवकाचा घरचा आहेर

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 08 2018 12:04AMपिंपरी : प्रतिनिधी

पवना धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा केला जात नाही. ‘पाणी अडवा आणि नगरसेवकांची जिरवा’ अशी नवीन मोहिम पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे त्यांचा गौरव केला पाहिजे, अशी उपरोधिक टीका सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केली.

 पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.6)झाली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभेत बोलताना नगरसेवक कामठे म्हणाले की, पाच सप्टेंबरला देशभरात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत साजरा केला गेला नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. दोन डझन विभागांसह शिक्षण विभागदेखील अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अधिपत्याखाली येतो. शिक्षक दिनाची त्यांना माहितीदेखील नव्हती. शिक्षक दिनाचा कार्यक्रम सोडून ते स्थायी समितीच्या बैठकीला आले. शिक्षक दिनापेक्षा स्थायी समितीची सभा महत्त्वाची आहे का, त्यांच्याकडे इतके विभाग आहेत की कुठल्या विभागात काय चालले आहे, हेच माहीत नसते. 

एका अधिकार्‍याकडे 2 ते 3 विभाग आणि आष्टीकर यांच्याकडे 50 विभाग हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे आष्टीकर यांच्याकडील काही विभाग कमी करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. 

तसेच, प्रभागात स्वच्छता केली जात नाही, घंटागाडी येत नाही. अधिकारी केवळ ठेकेदारांसोबत फिरण्यात दंग आहेत. शहरविकासाबात अधिकार्‍यांचे काहीच नियोजन नाही. शहरासाठी चांगल्या योजना आणल्या आहेत. अधिकारी तीन वर्षांनंतर बदलून जातील. परंतु, आम्हाला शहरातील जनतेला उत्तरे द्यायची आहेत. आम्ही  काय उत्तरे द्यायची, असा सवाल उपस्थित करत यामुळे पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल खंत वाटत असल्याचे ते म्हणाले. 

शिक्षक दिन साजरा न केल्याबद्दल भाजपच्या नगरसेविका प्रियंका बारसे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत त्यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. अधिक संख्येने विभाग असल्याबद्दल उपमहापौर सचिन चिंचवडे यांनीही मुद्दा उपस्थित केला. खुलासा करताना आष्टीकर यांनी सांगितले की, माझ्याकडे सहायक आयुक्त म्हणून मध्यवर्ती भांडार, प्रशासन, निवडणूक हे 3 विभाग आहेत. तर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त एकटे जबाबदार्‍या आहेत.