Mon, Apr 22, 2019 02:28होमपेज › Pune › अखेर पाणीपट्टी दरवाढ

अखेर पाणीपट्टी दरवाढ

Published On: Mar 01 2018 1:53AM | Last Updated: Mar 01 2018 1:34AMपिंपरी : प्रतिनिधी

विरोधकांचा तीव्र विरोध डावलून सत्ताधारी भाजपने पाणीपट्टी दरवाढीस उपसूचनेसह मंजुरी दिली. त्यानुसार प्रत्येक कुटुंबास 1 ते 6 हजार लिटर पाणी मोफत दिले जाणार असून, 6 हजार 1 ते 22 हजार 500 लिटरसाठी प्रति लिटरला 4 रुपये आणि 22 हजार 501 ते 30 हजार लिटरला 8 रुपये आणि 30 हजार लिटरपुढे वापरास 12 रुपये प्रति हजार लिटर पाणीपट्टी आकारली जाणार आहे. पाणीपुरवठा दरवाढीस विरोध करून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसेने सत्ताधार्‍यांचा निषेध करीत सभात्याग केला.

तहकूब सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.28) झाली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. भाजपचे विलास मडिगेरी यांनी प्रस्तावित दरात घटीची उपसूचना मांडली. त्यात कुटुंबास 1 ते 6 हजार लिटर पाणी मोफत आहे. 6 हजार 1 ते 22 हजार 500 लिटर पाणी वापरास प्रति हजार लिटरला 4 रुपये पाणीपट्टी आहे. 22 हजार 501 ते 30 हजार लिटर पाणी वापरास प्रति हजार लिटरला 8 रुपये आणि 30 हजार लिटरच्या पुढे प्रति हजार लिटरसाठी 12 रुपये दर निश्‍चित केला आहे. 

पाणीपट्टी दरवाढीस विरोधी सदस्यांनी तीव्र विरोध व्यक्त केला. विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले की, प्रथम शहरातील सर्व नागरिकांना पुरेसे पाणी द्या. त्यानंतर पाणीपट्टी दरवाढीचा विचार करा. सध्या शहरातील अनेक भागात पाणीटंचाई असताना पाणीपट्टी दरवाढीस आमचा स्पष्ट विरोध आहे. राजू बनसोडे म्हणाले की, दापोडी परिसरात बारा महिने पाणीटंचाई असल्याने पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी. सचिन भोसले म्हणाले की, शहरातील अनेक परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना शुद्ध व पुरेशा प्रमाणात पाणी द्या. 

मुंबईप्रमाणे वेळेवर पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्याबाबत पाणीपुरवठा विभाग अपयशी ठरला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी. मुंबईतील तज्ज्ञ मंडळी नेमून शहरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करावी, असा सल्ला भाऊसाहेब भोईर यांनी दिला. अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्याची ग्वाही आयुक्तांनी देऊनही त्यावर काहीच न झाल्याने शिवसेनेच्या मीनल यादव यांनी संताप व्यक्त करीत दरवाढीस विरोध दर्शविला. नाना काटे यांनीही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. विनया तापकीर यांनी चर्‍होली, मोशी भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची तक्रार मांडली. 

भाजपच्या सुवर्णा बोर्डे यांनी मागील सत्ताधार्‍यांनी चांगले काम न केल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांच्यावर केला. त्यावरून दोघींमध्ये वाद निर्माण झाला. त्यावर दोघींना सभागृहाबाहेर जाण्याची ताकीद देण्यात आली. पाठोपाठ महापौरांनी पाणीपट्टी दरवाढीचा विषय उपसूचनेसह मंजूर केल्याचे जाहीर केले. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोध सदस्यांनी विषयपत्रिका फाडून सभागृहात फिरकवली. 

महापौरांच्या आसनासमोर भाजपचा धिक्काराची घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले. मानदंड पळविण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी प्रत्युत्तर देत झिंदाबादच्या घोषणाबाजीत महापौरांनी शांतता राखण्याचे आवाहन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सभा 10 मिनिटे तहकूब केली. त्यानंतर त्यांनी विरोध दर्शवून पाणीपट्टी दरवाढीचा विषय मंजूर केला असून, चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगूनही विरोधकांनी गोंधळ बंद केला नाही. अखेर सभेचे कामकाज सुरू केल्याने विरोधकांनी सभात्याग केला.