Mon, Mar 25, 2019 02:51
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › रद्दीदानातून पेटविली ‘ज्ञानज्योत’

रद्दीदानातून पेटविली ‘ज्ञानज्योत’

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 10:45PMपिंपरी : वर्षा कांबळे

ज्या रद्दीला आपण घरामध्ये कवडी मोलाने विकतो, तिच रद्दी कोणासाठी तरी ज्ञानाचा प्रकाश होऊ शकते ही बाब चिंचवड येथील ओरिएन्टल मार्व्हल सोसायटीतील डॉ. सुमित्रा सगरी यांनी जाणली. आपण दिलेल्या रद्दीचा गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी उपयोग होऊ शकतो, या हेतूने त्यांनी रद्दीदानाचा उपक्रम राबविण्याचे ठरविले. यातून मिळालेल्या रकमेचा उपयोग ‘स्नेहवन’सारख्या संस्थेला करून तेथील मुलांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

चिंचवड येथील केशवनगर येथे जवळपास 150 सदनिकांची ओरिएन्टल मार्व्हल सोसायटी आहे. सोसायटीतील नागरिक दर आठवड्याला घोरावडेश्‍वर डोंगरावर जाऊन वृक्षारोपण करत असतात. तिथे आलेल्या आणखी एका ट्रेकिंगच्या ग्रुपमधील सदस्याने त्यांना ‘स्नेहवन’विषयी सांगितले आणि वृक्षारोपणाप्रमाणेच  रद्दीदानाचा उपक्रम राबवण्याचे सुचवले. हा उपक्रम सोसायटीतील रहिवाशांना आवडला. 
डॉ. सगरी यांच्या पुढाकारातून सोसायटीने गेल्या महिन्यापासून हा उपक्रम सुरु केला आहे. 150 घरांपैकी शंभर घरांनी जरी रद्दी दिली तर एका घरामागे दर महिन्याला पाच ते सहा किलो रद्दी निघते. अशाप्रकारे महिन्याला पाचशे किलो तरी रद्दी विकली जाते. त्यातून मिळणारी रक्कम ‘स्नेहवन’ येथील मुलांच्या शिक्षणासाठी वापरली जाते. 

अशोक देशमाने नावाच्या तरुणाने आयटीतील सॉफ्टवेअर इंजिनीअरची गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून आत्महत्याग्रस्त  शेतमजुरांच्या मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी स्नेहवन हा सामाजिक प्रकल्प भोसरी येथे चालू केला आहे.  सध्या 25  मुलांचे संपूर्ण पालकत्व घेवून त्यांचे शिक्षण, संगोपन स्नेहवनमध्ये केले जाते तसेच शेजारी असलेल्या नंदी समाजाच्या पालावरच्या 15 मुलींची शैक्षणिक जबाबदारीही स्नेहवनने घेतली आहे. कोणत्याही सरकारी अनुदानाविना हे काम चालू आहे.  

ओरिएन्टल मार्व्हल सोसायटीचा आदर्श घेऊन जर प्रत्येक सोसायटीने ठरविले तर रद्दीदान करुन गरीब, वंचित मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करू शकतात. रद्दीदानातून येणारी अनमोल मदत अशा वंचित बालगोपालांचे जीवनमान उंचावण्यासाठी नक्कीच मोलाची ठरेल एवढे मात्र नक्की.